प्रतिनिधी / सातारा :
प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून सातारा शहरातील माजगावकर माळावरील झोपडपट्टीधारकांना हक्काचे चांगले घर देण्याकरता पालिकेचे प्रयत्न सुरु आहेत. प्रत्यक्ष योजनेच्या कामास प्रारंभ झाला असून, पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट, अतिरिक्त मुख्याधिकारी पराग कोडगुले आणि मुख्य अभियंता दिलीप चिद्रे यांनी लाभार्थ्यांच्या समस्येचे निराकारण केले आहे. तेथील झोपडपट्टीधारकांनी सहमती दिली असून, आता 300 घरकुलांचा मार्ग सुकर बनला आहे.
सातारा शहरात पालिकेच्या माध्यमातून अनेक योजना येत असतात. त्या योजना राबवत असताना प्रशासनाला अनेक पातळीवर तोंड द्यावे लागते. त्यातून मार्ग काढत योजना पूर्णत्वाकडे नेल्या जातात. अशीच सर्वसामान्यांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी सातारा पालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घरकुल योजना राबवण्यासाठी लाभार्थ्यांकडून प्रस्ताव आले. आलेल्या प्रस्तावानुसार प्रकल्प उभारण्याकरता जागा ठरली. माजगावकर माळावर 1958 घरे बांधण्याचा प्रकल्पाचे कामाची निविदा प्रक्रिया गेल्या तीन वर्षापूर्वी होवून त्या कामास सुरुवात झाली. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात धिम्या गतीने काम सुरु होते. आता मात्र, या कामाने वेग घेतला आहे. आकाशवाणी झोपडपट्टीतील लाभार्थ्यानाही हक्काचे घर मिळणार आहे झोपडपट्टीधारकांनी स्वतःहून पालिकेने ठरवून दिलेल्या जागेत आपल्या झोपडय़ा हलवल्या गेल्या आहेत. त्यामुळे 300 घरांचा मार्ग सुकर झाला आहे. लवकरच त्यांना चांगले घर मिळेल असे पालिकेतून सांगण्यात आले.









