प्रतिनिधी/सातारा
मागासवर्गीय, अल्पसंख्याक व सुशिक्षित बेरोजगार तरूणांना कर्जासाठी शेतीचे उतारे, घराचे उतारे देताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. राज्यात पडलेला दुष्काळ अतिवृष्टी, महापूर या नैसर्गिक आपत्तीमुळे तरूणांनी कर्ज घेतलेल्या कर्जाची रक्कम (हप्ता) नियमित न भरल्यामुळे जप्तीला सामोरे जावे लागत आहे. तरूणांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने सरसकट कर्ज माफी करावी अशा मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. तर या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले की, सातारा नगर पालिकामध्ये मागासवर्गीय समाजाची मागणी नसताना निधी खर्च करण्यात येत आहे. सदर बझार ते भिमाई स्मारक–जरंडेश्वर नाका रस्त्याचे काम बंद करून ठेकेदाराला ब्लँक लिस्ट मध्ये टाकावे. त्या ठेकेदाराची चौकशी करावी. तसेच कनिष्क मंगल कार्यालय ते चर्च या रस्त्यावर कोटयावधी रूपयांचा निधी टाकून मागासवर्गीय समाजाची फसवणूक नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी केली आहे. त्यांची चौकशी करून निलंबित करण्यात यावे. 60 वर्षे रहिवासी असलेल्या कोंडवे ता. जि. सातारा मागासवर्गीयांना हक्काचे पाणी व घर मिळावे. लाडेगाव ता. खटाव विश्वकर्मा मागासवर्गीय गृहनिर्माण संस्था चेअरमन, सचिव यांनी शासन व सभासदांची फसवणूक केली आहे. संबंधितावर शासनाने गुन्हे दाखल करण्यात यावे यासह अन्य मागण्या करण्यात आल्या. या मागणीचा विचार न झाल्यास रिपाइंच्या वतीने प्रजास्तक दिनी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.
याचदरम्यान, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी करून देशाचा अपमान केला आहे. आम्ही युग पुरूषांना दैवत मानतो त्या व्यतिरिक्त कोणालाही दैवत मानत नाही. हे दाखवून देण्यासाठी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांनी मनुस्मृती पुस्तकाचे दहन केले. तशाच पद्धतीने नरेंद्र मोदीच्या पुस्तकांच्या मुख्यपुष्ठाच्या अर्ध पानाची होळी करून सातारा जिह्याच्या वतीने निषेध देखील नोंदवला.
यावेळी अश्विन गायकवाड, अमित मोरे, संतोष जाधव, दिपक गाडे, बाबा ओव्हाळ, सचिन गंगावणे, वंदना गायकवाड, माया माने, संतोष ओव्हाळ, रमेश गायकवाड व इतर पदाधिकारी उपस्थित होते.









