भविष्यातील शेती संरचना मागणीप्रणीत असणार आहे. सध्याच्या पुरवठाप्रणीत शेती संरचनेमुळे बाजारपेठेत शेतमालाचा पुरवठा वाढून त्याचे भाव घसरण्याचे डावपेच मध्यस्थ, दलाल नेहमी आखत असतात. त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागतो. शेतकऱयाला उत्पादन करणे इतकेच जमते. त्याचाच फायदा घेण्याच्या उद्देशाने कृषी संरचना बदलली पाहिजे. असे केल्याने मध्यस्थांचे आपोआपच उच्चाटन होईल. पुरवठाप्रणीत धोरणामुळे दलालाला भरघोस फायदा होतो, असे आजचे चित्र आहे. 20 व्या शतकाच्या मध्यापासून मागणीप्रणीत औद्योगिक उत्पादन व त्याचा पुरवठा या दृष्टीने खूप चिंतन झाले. बाजारातील मागणी-पुरवठय़ाच्या समतोलासाठी काय व कोणी कार्यवाही करावी या संदर्भातले लेखन अद्यापही केले जाते. पण त्याचा अवलंब शेती तंत्राला केला जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यासाठी शेतकऱयाला ऍग्रीप्रेन्युअर व्हावे लागते.
ऍग्रीप्रेन्युअर हा व्यापक विचारांचा आणि भविष्याचा वेध घेणारा विवेकी आणि कृतिशील कार्यकर्ता आहे. जर शेतमाल बाजारासाठीच पिकवायचे असेल तर ग्राहकांची अभिरुची, त्याची उत्पन्न पातळी, आवडीनिवडी, त्याच्या खर्चाचे विविध प्रसंग आणि त्यांची मागणी या किंवा अनेक घटकांचा विचार करून उत्पादनाचा निर्णय घेणारा हा ऍग्रीप्रेन्युअर असतो. त्याच्या अंदाजानुसार शेती व्यवस्थेमध्ये बदल करणे आवश्यक आहे. सध्याच्या ग्राहकांच्या आवडीनिवडी बदलताना दिसतात. पशुधन उत्पादनाच्या उपभोगामध्ये 15.5 टक्के वरून 24.2 पर्यंत वृद्धी झाल्याचे दिसते. तसेच फळे व भाजीपाल्याच्या मागणीमध्ये गेल्या 40-45 वर्षांत तिप्पट वाढ झालेली दिसते. तृणधान्यांच्या त्याच त्याच वस्तुंच्या उपभोगामध्ये शरीरातील झिंक, मॅग्नेशियम, सेलेनियम आणि आयोडिन यांचे प्रमाण घटताना दिसते. त्यामुळे प्रतिकारशक्ती कमी होऊन कोरोनासारख्या सांसर्गिक महामारीमुळे लोक मरताना दिसतात. जंक फूडच्या संस्कृतीमुळे मुलांमध्ये स्थूलता वाढून मुले डायबेटिक आणि बेडौल बनत आहेत. स्त्रियांच्यातील स्थूलपणा वाढत आहे. त्यानुसार शेती उत्पादनाचे निर्णय घ्यावे लागतील. विशेषतः शहरी भागातील लोकांच्या उपभोगामध्ये प्रथमतः बदल होतील. त्याचा फायदा शेतकऱयांना घेता येणार आहे. एकूण अन्न गटातील नगसंख्येच्या दरडोई उपभोगामध्ये घट झालेली दिसत असली तरी त्यांच्या मूल्यामध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे शेतकऱयांना त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत असल्याचे सिद्ध होते. फळांच्या बाबतीत दोन्ही गोष्टी वृद्धींगत झालेल्या दिसतात. पशुधन पदार्थांच्या गटातील वस्तूंचा उपभोग वाढत आहे. विशेषतः उत्पन्नाच्या पातळीबरोबर ते धनात्मक पातळीने वाढत आहेत.
तेलबियांच्या उपभोगामध्ये मोहरीच्या तेलाचा उपभोग वाढणार आहे. भुईमूग व इतर पारंपरिक तेलांच्या उपभोगामध्ये घट झालेली आहे. ती आणखी घटेल असे चित्र दिसते. थंडपेय व रस घटकांच्या (ज्यूस) उपभोगामध्ये वाढ होईल. विशेषतः ज्यूसच्या अनेक प्रकारामध्ये भर पडेल. आयुर्वेद, युनानी, सिद्ध आणि धनगरी काढे आणि औषधांच्या प्रभावामुळे नवनवीन औषधी वनस्पतींच्या लागवडी वाढतील. त्यामुळे न्यूटॅसिटिकल फार्मिंग अधिक होण्याचे संकेत मिळतात. मसाले व औषधी अन्नघटकाच्या सेवनामध्ये जागरुकता निर्माण होत आहे. पुन्हा एकदा 5000 वर्षापूर्वीची भारतीय संस्कृती प्रस्थापित होईल असे दिसते. वाढते शहरीकरण हे शेती व्यवस्थेला लागलेले ग्रहण आहे. पिकाऊ जमिनी कमी होत आहेत. दुबार पेर क्षेत्र वाढत आहे. साधारणतः 49 टक्के पेर क्षेत्र सिंचनाखाली आहे. सिंचनाचा प्रभाव शेतीवर जाणवत नाही. सिंचन क्षेत्रामध्ये 1.76 टक्क्मयांनी वाढ झाली आहे. पण स्थूल पीक क्षेत्र मात्र 0.2 टक्क्मयांनी वाढले आहे. निसर्ग, हवामान बदल, रोगराई यामुळे पिकांची गुणवत्ता घटत आहे. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती लाभलेल्या पीक संरचनेला महत्त्व येईल. कारण औषधे व किड नाशकांच्यावरचा खर्च परवडणारा नाही. 1980 नंतरच्या काळात एकूण अन्नधान्यांचा उत्पादकता वृद्धीदर 2.10 टक्क्मयांवरून 1.44 टक्क्मयांपर्यंत घटलेला आहे. कृषी आदान क्षेत्रामध्ये कृषी तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची आहे. मेकॅट्रॉनिक्स (मेकॅनिकल-इलेक्ट्रॉनिक्स) साधनांचा वापर वाढत आहे. नवनवीन बियाणे तंत्रज्ञान, तणनाशके, जीएम पिके आणि आधुनिक सेन्सार तंत्रज्ञानांचा वापर यामुळे शेती व्यवस्थेतील निर्णय अचूक होणार आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या पसंतीची म्हणजे मागणीप्रणीत कृषी व्यवस्था येऊ घातलेली आहे. शेतकऱयांनी थोडेसे भविष्य जाणून घेणे गरजेचे आहे. मागणीचे मोजमप होऊ शकते. अनेक कंपन्या व्यावसायिक पद्धतीने कार्य करीत आहेत किंबहुना ग्राहकांचे वास्तव्य (लोकेशन) देखील उपलब्ध होत आहे. त्यामुळे ‘फार्म टू फोर्क’ शेतीव्यवस्था जन्माला आलेली आहे. ती आणखी सुदृढ होईल. मागणींची नोंद करून उत्पादनाचे निर्णय घेणे शेती व्यवस्थेला आता शक्मय झाले आहे. उद्योग क्षेत्रामध्ये हे तंत्र खूपच लोकप्रिय आहे.
भविष्य काळातील शेती व्यवस्थेमध्ये जल, जमीन, जीवनसत्व यांची त्रिसूत्री धोरणे शेतकऱयांना सांभाळू शकतात. त्यावर शेतकऱयांनी बेईमानी करू नये. जमिनीचा योग्य वापर, त्याची पोत, योग्य तो आहार म्हणजे खते, योग्य प्रमाणातील पाण्याचा वापर (सूक्ष्म सिंचन व वाफ सिंचन व्यवस्था) अचूक निदानाचे सेन्सार, रोबो, ड्रोन, ट्रक्टर ऍक्सेसरिज, मूलद्रव्यांचा योग्य वापर, रासायनिक खतांचा मर्यादित वापर, अनुकूल भू-हवामानाच्या परिस्थितीतील पीकसंरचना अंगिकारून शेतीव्यवस्था बळकट करता येते. विशेषतः युवापिढीने (म्हणजे मुले-मुलीसुद्धा) शेती क्षेत्रामध्ये प्रवेश करावा. भार बनू नये. ‘जुने जाऊ द्या मरणालागून, जाळून किंवा पुरुनी टाका’ या कवितेतील अर्थाने युवापिढी घडली पाहिजे. भूतकाळ आपल्या हातात नसला तरी भविष्यकाळ आपल्या हातात आहे, हे लक्षात राहू द्यावे. यासाठी काय करावे? पर्यावरण आणि आर्थिक विकास यांची सांगड घालणारी धोरणे स्वीकारायला सरकारला प्रवृत्त करावे. स्वतः शाश्वत शेती आणि शेतीची शाश्वतता सांभाळणारी कृषी व्यवस्था अंगिकारावी. योग्य त्या वित्तीय संरचनेची गरज आहे. त्याची संस्थात्मक संरचना बदलावी. सामाजिक उत्पादनामध्ये विवेक असावा. चर्चा असावी, स्केल अँड साईज असावे. विभाजन-विनिमय असावे. शेतकऱयाला कर्जबाजारी बनविणारी कृषी-वित्त व्यवस्था नसावी. सामूहिक कृती क्षेत्राचे प्राबल्य वाढवावे, त्यामध्ये सामूहिक विवेक आणि विश्वास असावा.
तांत्रिक (सर्व क्षेत्रातील) विवेकाची मूलभूत-विज्ञानवादी भूमिका असावी. अमुल, नेस्ले, हेरिटेज, सगुणा, पेप्सी, नंदिनी, मदर डेअरी, सफल मार्केट, एचपी, एमसी, देसाई प्रुट्स अँड व्हेजिटेबल्स यांचे आदर्शन युवकांनी लक्षात घ्यावेत. कच्चामाल, प्रसंस्कारक्षम अन्नप्रक्रिया, पणन, वित्त आणि कृषीसंरचना यामध्ये आमूलाग्र बदल होत आहेत. ते अभ्यासपूर्ण तपासावे. पणनप्रणीत दृष्टी आणि मागणीप्रणीत कृषी उत्पादनांच्या तंत्राने शेती व्यवस्था पार बदलून जाईल. तशी मानसिकता निर्माण करणे हाच या लेखनामागचा उद्देश आहे.
डॉ. वसंतराव जुगळे-9422040684








