वार्ताहर/ चिपळूण
श्वसनाचा त्रास झाल्याने संगमेश्वर तालुक्यातील माखजन-धामपूर येथील सुरेश धर्मा धनावडे (50)यांचा कामथे शासकीय उपजिल्हा रूग्णालयात सोमवारी सायंकाळी मृत्यू झाला. त्या व्यक्तीचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्याचा अहवाल बुधवारी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने शासकीय नियमानुसार त्या व्यक्तीवर गावामध्ये अंत्यसंस्कार केले.
सुरेश धनावडे 3 मार्च रोजी मुंबईतून गावाला आले होते. त्यानंतर त्यांना 14 दिवसांसाठी होम क्वारंटाईन करण्यात आले. त्यांना दम्याचा त्रास असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना श्वास घेताना त्रास होत होता. त्यावर त्यांनी खासगी डॉक्टरांकडे उपचार घेतले. मात्र त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना सोमवारी दुपारी कामथे येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
या रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच सायंकाळी त्यांचे निधन झाले. या प्रकाराने कामथे येथील वैद्यकीय अधिकाऱयांसह, तालुका आरोग्य विभाग व प्रशासन हादरून गेले. त्या व्यक्तीच्या घशाच्या स्त्रावाचे नमुने (स्वॅब) तपासणीसाठी पुढे पाठवण्यात आले आहेत. त्याचा रिपोर्ट बुधवारी मिळण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शासकीय नियमानुसार माखजन येथील गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
‘त्या’ 15 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह
महसूल प्रशासन, आरोग्य विभाग व पोलीस यंत्रणेने कालुस्ते येथील एका मदरसामध्ये जमातीच्या 15जणांचे संस्थात्मक विलगीकरण केले होते. त्यांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी मिरज प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. या सर्वांचे रिपोर्ट कोरोना निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे प्रशासनासह आरोग्य विभागाने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.