पहिल्या टप्प्यातील लस अजूनही अनुपलब्ध : ऑक्टोबर ते मार्चमध्ये जोखमीचा काळ : 2016 मध्ये सापडला होता पहिला रुग्ण
विजय देसाई / सावंतवाडी:
कोरोनाशी सामना करणाऱया सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यातील जनतेला यंदा माकडतापाशीही सामना करावा लागणार आहे. कोरोनामुळे यंदा कर्नाटकमधून ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्र शासनाकडून मागविण्यात येणारी पहिल्या टप्प्यातील माकडताप प्रतिबंधक लस अद्यापही मागविण्यात आलेली नाही. त्यामुळे सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यातील जनतेसमोर विशेषत: शेतकऱयांसमोर माकडतापाचे संकट यंदा गडद असणार आहे. त्यातच माकड मरू लागल्याने आतापासूनच या संकटाची चाहूल लागली आहे.
डेगवे येथे मिळालेल्या मृत माकडाविषयी वनविभागाला कळवूनही त्यांनी दखल न घेतल्याने त्याची ग्रामस्थांनी विल्हेवाट लावली आहे. गतवर्षी या गावात माकडतापाने तरुणाचा बळी घेतला होता. ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत माकडताप अत्युच्च पातळीवर असतो. त्यामुळे या काळात ताप आलेल्या शेतकऱयांनी तपासणी करून घेणे आवश्यक आहे. कोरोनाच्या भीतीने तपासणी न केल्यास संकट गडद होऊ शकते. त्यामुळे तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. मृत माकड सापडलेल्या डेगवे गावातील लोकांनी ताप आल्यास तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. तपासणीची सुविधा ओरोस येथे आहे, असे आरोग्य विभागाने म्हटले आहे.
2016 मध्ये पहिला रुग्ण
दोडामार्ग तालुक्यात 2016 ला केर येथे माकडतापाचा पहिला रुग्ण सापडला होता. तो रुग्ण दगावला होता. त्यानंतर ही साथ दोडामार्ग तालुक्यात पसरली. या वर्षात सातजण दगावले. तर 129 पॉझिटिव्ह सापडले. प्रथम साथ आल्याने आरोग्य यंत्रणाही हडबडली. गोचिडमुळे ही साथ पसरत असल्याने शेतकरी वर्ग धास्तावला. त्यांनी काजू बागेत जाणे सोडून दिले. ताप येणे, डोकेदुखी आमिसार, नाक, घशातून रक्तस्राव, कंबरदुखी, खोकला अशी लक्षणे यात आहेत. यात लागण झालेला रुग्ण हैराण होऊन जातो. तो अशक्त बनतो. दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे या तापाबाबत भीतीचे वातावरण दोडामार्गात पसरले. दोडामार्ग-तळकट प्राथमिक आरोग्य केंदाचे डॉ. तुषार चिपळूणकर यांनी याचा अभ्यास केल्यानंतर ही साथ गोवा-सत्तरी मार्गे दोडामार्गात आली. तत्पूर्वी कर्नाटक-शिमोगा येथे ही साथ गेली अनेक वर्षे असून यात अनेकजण दगावल्याचे स्पष्ट झाले.
माकडतापावर औषध नसल्याने प्रतिबंधात्मक उपाय हेच या आजारावर रामबाण उपाय असल्याने त्या संदर्भात आरोग्य विभागाने जनजागृती सुरू केली. परंतु ही साथ दुसऱया वर्षी 2017 लाही आली. त्यात बाराजण दगावले. त्यात बांदा सटमटवाडीतील आठहून अधिकांचा समावेश आहे. या वाडीने या वर्षात माकडतापाची धास्ती घेतली. या वाडीत पै-पाहुणेही माकडतापाच्या भीतीने येत नव्हते. या वर्षात 202 माकडताप पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. माकडतापाने मृतांचे प्रमाण वाढल्याने याची राज्य सरकारने दखल घेतली.
कर्नाटकच्या तज्ञांची टीम दाखल
दीपक केसरकर पालकमंत्री असल्याने माकडताप रोखण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या. कर्नाटकातून तज्ञांची टीम मागविण्यात आली. या टीमने येऊन अभ्यास केला. तसेच येथील आरोग्य विभागाला मार्गदर्शन केले. माकडताप रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती दिली. त्या अंतर्गत गोचिड निर्मूलन हाती घेणे, जंगलात जाताना गोचिडपासून आवश्यक प्रतिबंध करणारे औषध शरीरावर फासणे, ताप आल्यानंतर रक्ताचे नमुने घेऊन तपासणे आदी उपाय सूचविले. त्यानुसार जिल्हा आरोग्य विभागाने उपाययोजना सुरू केल्या. दोडामार्ग, सावंतवाडी तालुक्यात जनजागृती केली. त्याशिवाय कर्नाटकमधून प्रतिबंधात्मक लस मागविली. ती देण्यास प्रारंभ झाला. त्यामुळे 2018 ला रुग्ण दगावण्याचे प्रमाण तीनवर आले. या वर्षात 112 माकडताप पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले. प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्याने माकडतापाचे रुग्ण दगावण्याचे आणि मिळण्याचे प्रमाण घटले. परंतु रुग्ण आढळत राहिले. लोकांनीही खबरदारी घेण्यास प्रारंभ केला.
या दरम्यान पुणे येथील राष्ट्रीय विषाणूजन्य संस्थेकडून रुग्णांच्या रक्ताचे अहवाल तपासण्यात येत होते. ते दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून गोवा-मणिपाल रुग्णालयातून तपासण्यात येऊ लागले. सावंतवाडीत त्यासाठी कक्ष स्थापन करण्यात आला. तर राज्य सरकारमार्फत हे संकट कायम राहणार असल्याने ओरोस येथे माकडताप तपासणी प्रयोगशाळा मंजूर करण्यात आली. त्यासाठी 20 कोटी रुपये मंजूर झाले.
यंदा गहिरे संकट
माकडतापाचे संकट 2019 मध्ये कायम राहिले. परंतु लस आणि प्रतिबंधात्मक उपायामुळे ते कमी झाले. या वर्षात केवळ दोन रुग्ण दगावले. तर 20 जण माकडताप पॉझिटिह रुग्ण मिळाले. कोरोनाचे संकट आल्यानंतर 2020 च्या सुरुवातीला डेगवे येथील तरुणाचा आणि पडवे-माजगाव येथील दोघांचा माकडतापाने मृत्यू झाला. मात्र, यंदा माकडतापाचे हे संकट अधिक आहे. कोरोनामुळे हे संकट अधिक गडद बनणार आहे. कोरोनामुळे ऑक्टोबरमध्ये कर्नाटकमधून येणारी पहिल्या टप्प्यातील लस आलेली नाही. ही लस या महिन्यात देण्यात सुरुवात होते. आता कोरोनाची भीतीही लोकांमध्ये आहे. त्यामुळे कोरोना की माकडताप अशी दुहेरी भीती असणार आहे. त्यामुळे आरोग्य विभागाला अधिक दक्षता घ्यावी लागणार आहे. माकड मृत मिळाल्यानंतर त्याच्या अंगावर मिळणारी गोचिड तपासणीसाठी पाठविणे आवश्यक आहे. परंतु डेगवे येथे मृत माकड मिळूनही त्याची दखल वनविभागाने घेतली नाही. त्यामुळे आरोग्य विभाग दक्षता कशी घेणार, हा प्रश्न आहे. imestamp









