300 गिर्यारोहकांना मिळाला परवाना, मास्क अन् सोशल डिस्टंन्सिंग आवश्यक
कोरोना महामारीमुळे नेपाळने मागील वर्षी गिर्यारोहणावर बंदी घातली होती. याचा थेट प्रभाव देशाच्या पर्यटनावर पडला, पण आता माउंट एव्हरेस्टसह 7 शिखरे गिर्यारोहणासाठी खुली करण्यात आली आहेत. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक नियमही लागू करण्यात आले आहेत. यात चाचणी, मास्क आणि सोशल डिस्टंन्सिंग अनिवार्य करण्यात आले आहे. माउंट एव्हरेस्ट बेस कँपमध्ये वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले आहे.
यंदा पार्टी होणार नाही तसेच गिर्यारोहक परस्परांची गळाभेटही घेऊ शकणार नाहीत. केवळ दूरवरून ‘नमस्ते’ होईल. नियमांच्या अंतर्गत नेपाळमध्ये येणाऱया प्रत्येक विदेशी गिर्यारोहकाला काठमांडू विमानतळावर आरटी-पीसीआरचा निगेटिव्ह अहवाल किंवा लसीकरणाचे प्रमाणपत्र दाखविणे अनिवार्य आहे.
शेर्पांवर संकट
नेपाळने कोरोनाच्या काळात बरेच काही गमावले आहे. अनेक नेपाळींसाठी तीन महिन्यांचा गिर्यारोहणाचा हंगाम वर्षभराच्या उत्पन्नाचा एकमात्र स्रोत आहे. मागील वर्षी कोरोनामुळे देशातील 15 लाख लोकांचा रोजगार बुडाला आहे. एव्हरेस सर करण्यासाठी येणाऱया विदेशी गिर्यारोहकांवर बंदी घातल्याने येथील लोकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्रत्येक एव्हरेस्ट टीममध्ये शेर्पा समुदायाचा एक व्यक्ती असतो, गिर्यारोहण बंद झाल्याने या शेर्पांना गावी परतावे लागले होते. मागील एक वर्षापासून ते सर्वजण बटाटय़ाची शेती करून गुजराण करत आहेत.









