वार्ताहर / कार्वे
मांडेदुर्ग येथे सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत येथील दयानंद विठोबा नांगनुरकर, भावकु यमाजी नांगनुरकर यांच्या गवत गंज्या जळून खाक झाल्या. तर तुकाराम यमाजी नांगनुरकर यांची गवताची गंजी बाजूला काढण्यात येथील तरुणांच्या व गावातील नागरिकांच्या अथक प्रयत्नांना यश आले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास येथील गवताच्या एका गंजीला आग लागली. आगीचे नेमके कारण अद्यापही अस्पष्ट आहे. आगीची बातमी गावात समजताच गावातील तरुणांनी व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने पाठीमागील बाजूस असलेली मोठी गंजी तरुणांनी व ग्रामस्थांनी बाजूला काढण्याचे काम सुरू केले. बघता बघता तुकाराम नांगनुरकर यांची गंजी बाजूला काढण्यात यश आले. त्याच वेळी पूर्वेकडील असलेल्या मोठ्या घरा शेजारी कडबा ठेवला होता. त्याला आग लागली असती तर घर सुद्धा संकटात सापडले असते. गडहिंग्लज नगर परिषदेच्या अग्निशमन बंबानी आग आटोक्यात आणण्यास मदत केली. त्यापूर्वी गावातीलच खडीमशीन व रस्त्याचे डांबरीकरण करणाऱ्या कंत्राटदाराच्या टँकरने पाण्याचा पुरवठा करण्यात आला होता.
दयानंद नांगनुरकर व भावकु नांगनुरकर ही दोन्ही शेतकरी कुटुंबे आहेत. शेतीसह त्यांचा दुग्ध व्यवसाय आहे. कुटुंबांचा उदरनिर्वाह या व्यवसायावरच प्रामुख्याने चालतो. दोघांच्याही गोठ्यात आठ – दहा जनावरे आहेत. मात्र या घटनेमुळे या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. साधारणपणे दीड दोन लाख रुपयांच्या किमतीचे गवत जळून खाक झाले आहे. अशा परिस्थितीत कुटुंबाने उभे कसे राहायचे हा प्रश्न आहे. यासाठी या नुकसानीची दखल शासनाने घ्यायला हवी. या घटनेचा पंचनामा करून नुकसानग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.
चंदगड नगरपंचायतीकडे अग्निशमन बंब हवा
गडहिंग्लज नगर परिषदेकडे अग्निशमन बंब उपलब्ध आहे. त्याचा फोन नंबर उपलब्ध करून संपर्क केला. मात्र गडहिंग्लजहून मांडेदुर्ग येथे येण्यासाठीच्या कालावधीत आगीने रौद्ररूप घेतले होते. बंब याठिकाणी उपस्थित राहिला त्यावेळी मोठ्या प्रमाणात आग आटोक्यात आणण्याचे काम येथील तरुणांनी व ग्रामस्थांनी पार पडले होते. आता चंदगड नगरपंचायत अस्तित्वात आली आहे. या ठिकाणी अग्निशमन बंब उपलब्ध व्हावा, अशी मागणी नागरिकांतून होत होती.