कोरोनाच्या उदेकात जगाची दोन वर्षे वाया गेली आहेत. या उदेकाचा सर्वाधिक फटका जगातील प्रवासी विमान कंपन्यांना बसला आहे. जवळपास सर्व विमान कंपन्या सध्या तोटय़ात असून गेल्या दोन वर्षांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. या धडपडीतूनच अधिकाधिक प्रवासी मिळविण्यासाठी वेगवेगळय़ा क्लृप्त्या योजल्या जात आहेत. अमेरिकेच्याक प्रंटियर एअरलाईन्स या कंपनीने एक अनोखी युक्ती प्रवाशांना आकर्षित करून घेण्यासाठी योजलेली आहे.
अमेरिकेचे लोक प्राणीप्रेमी मानले जातात. कित्येक श्रीमंतांनी त्यांच्या मालमत्तेचा मोठा हिस्सा पाळीव श्वानांसाठी मृत्युपत्राद्वारे दिल्याची उदाहरणे आहेत. याच प्राणीप्रेमाचा लाभ उठवण्यासाठी या कंपनीने ‘मांजराचे एक पिलू दत्तक घ्या आणि एकदा विमान प्रवास विनामूल्य मिळवा’ अशी अनोखी योजना आणली आहे.
चर्चेत असणाऱया या मांजरीच्या पिलांची नावे फ्रंटियर, स्पिरिट आणि डेल्टा अशी आहेत. याच नावाच्या प्रवासी विमान कंपन्या अमेरिकेत आहेत. न्यूयॉर्क पोस्ट या नियतकालिकाच्या म्हणण्यानुसार लासवेगास येथील प्राणी निवारा केंद्रात ही पिले ठेवण्यात आली आहेत. या पिलांचे वय साधारणतः दोन आठवडे इतके आहे. ट्विटरवर त्यांची माहिती देण्यात आली आहे. त्यांना पाहण्यासाठी सानांपासून थोरापर्यंत साऱयांची गर्दीही होत आहे. अद्याप या पिलांना कोणी दत्तक घेतल्याचे ज्ञात नाही. तथापि, विमान कंपनीकडून अशा प्रकारची ऑफर येणे वैशिष्टय़पूर्ण मानले जात आहे.









