आरोग्य सचिव नीला मोहनन यांची माहिती
प्रतिनिधी / पणजी
मांगोर हिल वास्को हा भाग ‘कंटेनमेंट झोन’ म्हणून जाहीर करण्यात आला आहे. कोरोना पॉझिटिव्ह सापडलेल्या सर्व रुग्णांचा प्रवास इतिहास, त्यांचे संपर्क, ते कोठे कोठे गेले होते अशी सर्व माहिती मिळविण्याचे काम चालू असल्याची माहिती आरोग्य सचिव नीला मोहनन यांनी दिली. राज्यात सध्या 29 पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेतसांगितले.
कोरोनाचे स्थानिक किंवा सामाजिक प्रसारण झाल्याचा निष्कर्ष लगेच काढता येत नाही. तसा तो काढणे किंवा तसे म्हणणे चुकीचे आहे. शेजारीपाजारी, संपर्कातील सर्वांची तपासणी चाचणी केल्यानंतरच त्याबाबत नेमका निष्कर्ष काढता येऊ शकतो, असे मोहनन म्हणाल्या.
केवळ दोनच रुग्णांची खात्री
पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले म्हणून लोकांनी घाबरू नये तसेच कोणी भीतीही पसरवू नये. सर्वांची सुरक्षा महत्त्वाची असून त्यासाठी सर्वोच्च प्राधान्य आहे. मांगोर हिलमधील सर्व कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती घेण्याचे काम चालू असून तेथील सर्वांची तपासणी लवकरात लवकर करण्यात येणार आहे. मांगोल हिल वास्को येथे दोन पॉझिटिव्ह रुग्णांची खात्री झाली असून इतरांची अजून खात्री झालेली नाही, असे त्या म्हणाल्या.
सोमवारी एकूण 1289 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून 1030 जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. शिल्लक नमुन्यांचा अहवाल येणे बाकी आहे. एकूण 8 जणांना संशयित म्हणून आयसोलेशन वॉर्डात भरती करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
तपासणी अहवाल मोबाईलवर
गोव्यात येणाऱयांसाठी असलेली एसओपी व त्यांची कोविड तपासणी चाचणीचा निकाल त्यांच्या मोबाईलवर पाठवला जात आहे. त्यांनी कोरोना चाचणी निकालाची मोबाईलवर प्रतीक्षा करावी, असे त्यांनी नमूद केले. जर कोणाला ताप येत असेल आणि तो कमी होत नसेल तर त्वरित त्यांनी आपल्या डॉक्टरला दाखवावे. त्यांचा सल्ला घ्यावा, किंवा जवळच्या आरोग्य केंद्रात तपासणीसाठी जावे, असे आवाहन नीला मोहनन यांनी केले आहे.
मांगोर हिलमधील प्रत्येकाची तपासणी होणार : राणे
प्रतिनिधी / पणजी
मांगोर हिल-वास्को हा दाट लोकवस्तीचा भाग असून तेथून कोरोनाची लागण इतरत्र पसरू नये म्हणून काळजी घेण्यात येणार आहे. तसेच लोकवस्तीमधील प्रत्येकाची कोरोना तपासणी केली जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली. तो भाग हॉटस्पॉट व कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. सध्या त्या भागात 6 जण पॉझिटिव्ह मिळाले असून आणखी काहीजण पॉझिटिव्ह आहेत की नाही हे तपासणी केल्याशिवाय कळणार नाही. ती तपासणी कशी करता येईल यावर सध्या विचार सुरू असून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केल्याशिवाय आता गत्यंतर नाही. प्रत्येकाने मास्क घातणे, हात सॅनिटायझरने स्वच्छ करणे, सामाजित अंतर राखणे या गोष्टी सर्वांनी काटेकोरपणे पाळण्याची गरज आहे, असे आवाहन मंत्री राणे यांनी केले.
हे सामाजिक संक्रमण आहे की नाही ते शोधून काढण्यासाठी त्या भागातील सर्वांची कोविड चाचणी करावी लागेल. त्यानंतरच त्यावर अधिक प्रकाश पडू शकतो. सध्या तो भाग सील करण्यात आला असून फक्त अत्यावश्यक वस्तूंच्या वाहनांना परवानगी आहे, असे ते म्हणाले.









