प्रतिनिधी/ पणजी
राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची सख्या काल मंगळवारी पुन्हा वाढली. काल दिवसभारात 90 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. त्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 739 झाला, तर काल 95 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सोमवारी 52 कोरोना बाधित सापडले होते. त्यामुळे थोडा दिलासा मिळाला होता, मात्र कोविड इस्पितळातील अतिदक्षता विभागात सेवा बजावणारे दोन डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. मांगोरहिल वास्कोची स्थिती बरीच नियंत्रणात आली आहे.
हॉटस्पॉट ठरलेल्या मांगोरहिल वास्कोची स्थिती बरीच नियंत्रणात आली असून आता केवळ 44 रुग्ण पॉझिटिव्ह स्थितीत आहेत. त्यामुळे मांगोरहिल व वास्कोतील लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे, मात्र दुसऱया बाजूने मांगोरहिलशी संबंधित प्रकरणे वाढत आहेत. मांगोरहिलशी संबंधित रुग्णांचा आकडा 242 झाला आहे. सडा वास्को येथे 73 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. बायणा येथे 74 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. न्युवाडे वास्को येथे 61 तर झुवारीनगर येथे 101 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. खारीवाडा वास्को येथील रुग्णसंख्या 31 झाली आहे.
कुडतरी येथील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 32 आहे. चिंबल येथील रुग्णसंख्या 53 झाली आहे. मार्ले सत्तरी येथील आकडा 22 आहे तर बाळ्ळी येथील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 24 झाली आहे. सांखळी येथील रुग्णसंख्या 44 झाली तर फोंडा येथील रुग्णसंख्या 29 झाली आहे. वाळपईतील रुग्णसंख्या 11 आहे तर माशेल 5, उसगाव 6, डिचोली 10, शिरोडा 7, पेडणे 8, पिलार 3, गोवा वेल्हा 9, बेतकी 10, सांगे 3, मंडूर 12 अशी रुग्णसंख्या आहे. धारबांदोडा येथील रुग्णसंख्या 16 झाली तर अन्य बऱयाच ठिकाणी नव्याने रुग्ण सापडले आहेत. चाचणी केलेल्या 3197 रुग्णांपैकी 2057 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर 1050 चाचण्यांचे अहवाल अजून यायचे आहेत.
डॉक्टर, कर्मचाऱयांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना
कोरोनाचा फैलाव वाढू लागल्याने आता गोवा वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर, कर्मचारी व रुग्णांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या उपाययोजना केल्या आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक माहिती, सामाजिक अंतर व अन्य आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. कोविड इस्पितळातील दोन डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाल्याने आता डॉक्टरांच्या सुरक्षेचाही विषय निर्माण झाला आहे.
दिवाडी बेटावर एकही रुग्ण नाही
दिवाडी येथे कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला नाही. मंगळवारच्या वृत्तात दिवाडी येथे तीन रुग्ण सापडल्याचे प्रसिद्ध झाले होते. मात्र अधिक चौकशी अंती तेथे एकही रुग्ण नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दिवाडी बेटावरील सां मातियशचे सरपंच मोहन वळवईकर यांनीही एकही रुग्ण नसल्याचे स्पष्ट केले.









