बुधवारी सापडले 47 रुग्ण : एकटय़ा मांगोरहिलमधील 40 जण : दोघेजण दुबईहून आलेल्यांमधील : एनआयओत बालिक बाधित
प्रतिनिधी / वास्को, पणजी, मडगाव
वास्कोतील मांगोरहिल भागात कोरोनाच्या सामूहिक संसर्गाचा उद्रेक झाला आहे. मंगळवारी सापडलेल्या 6 कोरोनाबाधितांनंतर सरकारने हा परिसर सील केला आहे. या भागातील नागरिकांची सक्तीने तपासणी सुरु केली असून मंगळवारी केलेल्या 200 स्वॅब चाचण्यांपैकी 47 जण कोरोनाबाधित झाल्याने सारा गोवा हादरला आहे. वास्कोसह संपूर्ण गोव्यात कोरोनाची लागण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुबईहून आलेल्या विमानातील 143 जणांपैकी 2 जण बाधित सापडल्याने इतर प्रवाशांचा गोंधळ उडाला. त्याचबरोबर दोनापावला येथील एनआयओ कॉलनीमध्ये एक बालिक कोरोनाबाधित झाल्याचे आढळून आल्याने हा परिसरही सील करण्यात आला आहे. जनतेने घाबरुन जाऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. त्याचबरोबर वास्को संपूर्ण शहर लॉकडाऊन करण्यास त्यांनी नकार दर्शविला आहे.
कोरोनाच्या उदेकामुळे कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आलेल्या वास्कोतील मांगोरहिल वस्तीत काल बुधवारी तेथील 353 नागरिकांचे स्वॅब नमुने गोळा करून कोविड तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. मंगळवारी या वस्तीत 202 नागरिकांचे स्वॅब नमुने गोळा करण्यात आले होते. त्यातील चाळीस जणांचे अहवाल पोझिटीव्ह असल्याचे जाहीर करण्यात आलेले आहे. त्यामुळे मांगोरहिल कोरोना रूग्णांचा आकडा आता पन्नाशीकडे सरकला आहे. सोमवारी मासेविक्रेत्यापासून सुरु झालेली ही कोरोनाची साखळी वाढत असून त्यामुळे लोकांमध्ये भीती पसरली आहे.
आतापर्यंत 555 नागरिकांचे स्वॅब नमुने गोळा
मांगोरहिलच्या दाट वस्तीत दुसऱया दिवशीही आरोग्य खात्याच्या पथकाने सुरू केलेल्या शिबिरात दिवसभरात 353 नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांच्या स्वॅबचे नमुने गोळा केले. गेल्या दोन दिवसांत 555 नागरिकांनी तपासणीसाठी हजेरी लावलेली असून ही तपासणी पुढील काही दिवस सुरूच राहणार आहे. या तपासणीबरोबरच आरोग्य खात्याचे पथक आणि प्रशासकीय कर्मचारी या वस्तीतील कुटुंबांची चौकशी करीत असून आजारी लोकांचीही माहिती घेतली जात आहे.
काही जणांकडून आडवाटांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न
या वस्तीतील काही लोक आडवाटांचा वापर करीत बाहेर पडत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. बुधवारी सकाळी या वस्तीत तेथील कुटुंबांची चौकशी चाललेली असताना एका कुटुंबातील एक युवक झुआरीनगरात भाजी विकण्यासाठी गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला तपासणीसाठी आणले. या वस्तीतील काही मुजोर लोक प्रशासनाला हुलकावणी देण्याचा प्रयत्न करीत असून त्यांच्यावर कडक नजर ठेवण्याची गरज स्थानिक लोकांकडून व्यक्त होत आहे.
जीवनावश्यक वस्तू पुरवण्यासाठी प्रशासनाकडून व्यवस्था
मांगोरहिलच्या लोकांसाठी जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठय़ासाठी प्रशासनाने योग्य व्यवस्था केलेली आहे. त्यासाठी तसेच वैद्यकीय मदतीसाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली आहे. या वस्तीतील मारूती मंदिर आणि गुरूव्दारासमोर अशा दोन ठिकाणी जीवनावश्यक साहित्य उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच मुरगाव पालिका कचरा उचलण्याचे कार्यही करणार आहे.
कोरोना रुग्ण संख्या पोहोचली 69 वर
बुधवारी एकाच दिवसात आतापर्यंत सर्वाधिक 47 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण रुग्णांची संख्या 69 वर पोहोचली आहे. अचानकपणे वाढलेल्या या रुग्णांमुळे वास्कोसह संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. मांगोरहिल वास्को या भागात काल 40 पेक्षा अधिक कोरोनाबाधित सापडल्याने आरोग्य खाते सतर्क झाले आहे. येथील वाढते संक्रमण पाहता आणाखी रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार कालचे नव्याने मिळालेले 47 रुग्ण धरून आतापर्यंत गोव्यातील कोरोनाबाधितचा एकूण आकडा 126 झाला आहे. त्यातील 57 रुग्ण बरे झाले असून 69 रुग्ण आता कोरोनाबाधित आहेत. त्या सर्व रुग्णांवर मडगावच्या कोविड इस्पितळात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याने सांगण्यात आले. तीन रुग्णांना संशयित कोरोनाबाधित म्हणून आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांचा तपासणी अहवाल येणे बाकी आहे.
राज्यभरात 391 जण क्वारंटाईनमध्ये
बुधवारी दिवसभरात 22 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले. 18 जणांना पॅसिलिटी क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. आयसोलेशन वॉर्डमध्ये कालचे 3 रुग्ण धरून एकूण 15 रुग्ण भरती आहेत. विविध रेसिडेन्सी, हॉटेल्स मिळून एकूण 391 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
काल 1438 नमुने कोरोना तपासणीसाठी पाठविले होते त्यातील 1277 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 47 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून उर्वरित तपासणी अहवालांची प्रतीक्षा करण्यात येत आहे. मांगोरहील या भागातील लोकांची मोठय़ा प्रमाणात कोरोना तपासणी सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
एनआयओ कॉलनीत दोन वर्षांचा बालिक कोरोनाबाधित
दोनापावला येथील एनआयओ कॉलनीतील दोन वर्षाची बालिक कोरोनाबाधित सापडल्याने तेथे घबराट पसरली आहे. ती संपूर्ण कॉलनी आता सॅनिटाईझ करण्यात आली असून तेथील रहिवाशांची तपासणी करणे अनिवार्य झाले आहे. सदर बालिक आईवडिलांसह अलिकडेच हैदराबाद येथे गेले होते. येथून परत आल्यानंतर त्या बालकात कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने तपासणी करण्यात आली तेव्हा ती कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. आईवडिल मात्र कोरोना चाचणीत निगेटिव्ह मिळाले असून त्या बालिकेला मडगावातील कोविड इस्पितळात पाठविण्यात आले आहे.









