प्रतिनिधी/ पणजी
मांगोरहिल कंटेनमेंट झोनची काल मर्यादा 15 दिवसांनी वाढवण्यात आली असून तेथील अत्यावश्यक साहित्याची दुकाने खुली करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ऍन्टीबॉडी तपासणी तेथूनच सुरू करण्याचे ठरवण्यात आले असून कोविड निगेटिव्ह असणाऱयांना त्या झोनमधून बाहेर जाण्यास अनुमती देण्यात आली असली तरी त्यांनी पुन्हा झोनमध्ये न येता बाहेरच रहावे, अशी अट घालण्यात आली आहे.
‘मांगोरहिल’संदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मुरगाव तालुक्यातील चार आमदार तसेच तेथील नगरसेवक व इतर संबंधितांची पर्वरी सचिवालयात खास बैठक घेऊन तेथील समस्यांवर चर्चा केली.
कंटेनमेंट झोन खुला करणे धोक्याचे
मांगोरहिल मधून कोरोनाचा प्रसार सर्वत्र झाल्याने तेथील कंटेनमेंट झोन लगेच खुला करता येणार नाही. तेथे कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत ते बंद झालेले नाहीत. त्यामुळे तेथील लोकांनी आणखी 15 दिवस तरी कळ सोसावी. मांगोरहिल कंटेनमेंट झोनला 35 दिवस झाले असून त्याची मर्यादा आणखी 15 दिवस वाढवल्याचे डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.
बाहेर पडणाऱयांनी बाहेरच राहण्याची अट
ज्यांना तेथून नोकरी, व्यवसाय व इतर कामासाठी बाहेर जायचे असेल त्यांनी कोविड तपासणी करून घ्यावी. निगेटिव्ह अहवाल असलेल्यांनाच बाहेर जाण्याची अनुमती आहे. तथापि त्यांनी सदर झोनच्या बाहेर आपल्या रहाण्याची सोय करावी व पुन्हा मांगोरहिलमध्ये येऊ नये, अशी स्पष्ट अट घालण्यात आली असल्याचे डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.
जीवनावश्यक वस्तू मोफत पुरविणार
तेथील जनतेला अत्यावश्यक वस्तू पुरवण्याचे निर्देश संबंधित जिल्हाधिकाऱयांना देण्यात आले असून त्याचे वितरण मोफत करण्यात येणार असल्याचे डॉ. सावंत म्हणाले. मांगोरहिल कंटेनमेंट झोनमधील भाजी, फळे, दूध, कडधान्य, औषधे अशी गरज असलेली दुकाने सुरू करण्यास मान्यता देण्यात आली असून तेथील रहिवाशांनी थोडा संयम पाळावा, असे आवाहन डॉ. सावंत यांनी केले. त्या झोनमधील पोलिसांनी घरी न जाता बराकमध्ये रहावे, असेही डॉ. सावंत यांनी सूचित केले आहे.









