चाचणीनंतरच प्रसाराची व्याप्ती स्पष्ट होणार
प्रतिनिधी / वास्को
कोरोना संसर्गाच्या धास्तीने काल मंगळवारपासून वास्को मांगोरहिलच्या वस्तीमध्ये कोविड तपासणी करण्यास सुरूवात करण्यात आली असून काल दिवसभरात 202 नागरिकांच्या लाळेचे नमुने गोळा करण्यात आले आहेत. या तपासणीच्या अंतिम अहवालानंतरच वास्कोत कोरोनाचा संसर्ग कुठपर्यंत पसरला आहे याचा अंदाज येणार आहे. लाळेचे नमूने गोळा करण्याचे काम आजही होणार आहे.
वास्कोतील मांगोरहिलच्या वस्तीत सोमवारी एकाच कुटुंबातील पाच व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आल्याने वास्कोत कोरोना प्रसाराचा धोका वाढलेला आहे.
दिवसभरात 202 नागरिकांची तपासणी
नाक्यावरील एका चहाच्या हॉटेलमध्येच तपासणीसाठी शिबिर उघडण्यात आलेले आहे. या शिबिरात हजर राहून स्थानिक नगरसेवक फेड्रीक हेन्रीक्स यांनी स्वतःहून तपासणी करून घेतली. इतरांनाही तपासणीसाठी प्रोत्साहित केले. त्या कुटुंबाच्या शेजाऱयांना व जवळपास राहणाऱयांची तपासणी प्रथम करण्यात आली. काल दिवसभरात या वस्तीतील 202 नागरिकांना तपासून त्यांच्या लाळेचे नमुने कोविड चाचणीसाठी गोळा करण्यात आले. मांगोरहिलच्या परिसरात सध्या शुकशुकाट निर्माण झालेला असून कधी नव्हे एवढी शांतता दिसत आहे. स्थानिक लोकांना जीवनावश्यक वस्तू मिळवण्यासाठी काय करावे लागेल, याची माहिती अद्याप लोकांपर्यंत पोहोचलेली नाही.
रूग्णांची संख्या वाढल्यास वास्को लॉकडाऊन – आल्मेदा
वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांनीही मांगोरहिलमध्ये कोरोनाचे रूग्ण आढळून आल्याने चिंता व्यक्त केली आहे. खबरदारी आणि उपाययोजनांसाठी आरोग्य सचिव व जिल्हाधिकाऱयांशी आपण संपर्क ठेवलेला असल्याचे स्पष्ट करून लोकांनी घाबरून जाऊ नये. मात्र लोकांनी सरकारने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे. रूग्ण वाढत असल्याचे आढळून आल्यास पूर्ण वास्कोत लॉकडाऊन जाहीर करणेच योग्य ठरणार असल्याचे आमदार कार्लूस आल्मेदा यांनी म्हटले आहे.









