प्रतिनिधी / वास्को
मांगोरहिल येथील कंटेनमेंट झोनमधील 35 व्यक्तींनी बुधवारी प्लाझमा दान केले. युनायटेड सिटिजन्स ऑफ मांगोर यांनी येथील मांगोर स्पोर्टस् क्लबच्या हॉलमध्ये गोमेकॉच्या मदतीने प्लाझमा दान शिबिराचे आयोजन केले होते. आवश्यकता भासल्यास असा उपक्रम पुन्हा एक घडवून आणण्यात येईल असे आयोजकांनी म्हटले आहे.
मांगोरहिल येथील कंटेनमेंट झोनमध्ये हल्लीच जवळपास पावणे सहाशे लोकांची ऍन्टी बॉडी चाचणी करण्यात आली होती. या चाचणी दरम्यान अनेकांच्या शरीरांमध्ये कोरोनाविरूध्द लढणारी प्रतिकार शक्ती आढळून आलेली आहे. आमदार कार्लुस आल्मेदा यांनी यांच्या पुढाकाराने ऍन्टीबॉडी चाचण्या करण्यात आल्या होत्या. ज्यांच्यामध्ये कोरोनाविरूध्द लढण्याची प्रतिकार शक्ती आढळून येईल असे लोक स्वताहून प्लाझमा दान करण्यासाठी पुढे येतील अशी आशा आमदार कार्लुस आल्मेदा यांनी व्यक्त केली होती. काही व्यक्तींनी बुधवारी प्लाझमा दान करून गंभीर रूग्णांचा जीव वाचवण्यासाठी सहकार्य केले. त्यामुळे ज्या मांगोरहिलच्या लोकांना भयावह नजरेने आतापर्यंत पाहण्यात आलेले आहे, तेच लोक गोव्यातील लोकांचा जीव वाचवण्याच्या कामी येणार आहे असे दिसून येते.
युनायटेड सिटीजन्स ऑफ मांगोर या संस्थेने व मुरगावचे नगरसेवक सैफुल्ला खान यांनी संयुक्तरीत्या या प्लाझमा दान शिबिराचे आयोजन केले होते. गोमेकॉच्या रक्तदान पेढीचेही त्यांना सहकार्य लाभले. सकाळी साडे नऊ वाजल्यापासून दुपारी साडे बारा वाजेपर्यंत हे शिबिर चालले. या शिबिरात एकूण 35 व्यक्तींनी प्लाझमा दान केल्याची माहिती नगरसेवक सैफुल्ला खान यांनी दिली. गरज पडल्यास आणखी अशा प्रकारचे शिबिर आयोजीत करून गंभीर रूग्णांचे जीव वाचवण्याचे प्रयत्न आम्ही करू असे नगरसेवक खान म्हणाले.









