वार्ताहर / कारदगा :
मांगूर (ता. निपाणी) येथील एका 47 वषीय महिलेचा मंगळवारी कोल्हापूर येथील सीपीआर येथे मृत्यू झाला. सदर महिलेचा मृत्यू कोरोनाने झाल्याचे निष्पन्न झाल्याची बातमी मांगूर ग्रामपंचायतीला मिळताच मांगूर ग्रामपंचायतीने सतर्कता म्हणून मांगूर येथे चार दिवस सीडाऊन करण्याचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला. त्याला जनतेतून शंभर टक्के प्रतिसाद मिळाला आहे.
मंगळवारी सायंकाळनंतर सदर महिलेचा मृत्यू झाला मृत्यूनंतर सदर महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती मांगूर ग्रामपंचायतीला मिळताच मांगूर ग्रामपंचायत प्रशासनाने सतर्कता आणि खबरदारीसाठी बुधवारपासून शनिवार 11 अखेर मांगूर गाव पूर्णपणे सीलडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.
सदर मृत महिलेचा पती, मुलगा आणि अन्य एक नातेवाईक अशा तिघांचा स्वॅब घेण्यात आला होता. यातील दोघांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामुळे मांगूरकरांना थोडासा दिलासा मिळाला आहे. तसेच मांगूर येथील सात जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले असून त्यांचे रिपोर्ट अद्याप आलेले नाहीत. खबरदारी घेण्याच्या दृष्टीकोनाने ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने मृत महिलेच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करण्यासह परिसर सील करण्यात आला आहे.
बारवाड बंदला प्रतिसाद
मांगूर गाव हे बारवाडपासून अवघ्या तीन कि. मी. अंतरावर असून मांगूर येथे कोरोनामुळे महिला दगावल्याने बारवाड येथेही खबरदारी घेण्यात आली आहे. बारवाड गाव कोरोना रोगाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून ग्रामपंचायतीने गुरुवार 9 पासून रविवार दि. 12 अखेर गावातील संपूर्ण व्यवहार शंभर टक्के बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून त्यालाही बारवाडवासीयांनी प्रतिसाद दिला आहे.









