प्रतिनिधी/ सातारा
मुबंई येथे 2017 सालात झालेल्या अग्नितांडवात 200 जणांचे जीव वाचवणाऱया सुरक्षा जवान महेश साबळे यांना सर्वोत्तम जीवन रक्षा पदक जाहीर करण्यात आले आहे. महेशने मंगळवारी गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांची भेट घेतली त्यावेळी त्याच्या धाडसाचे कौतुक करत मंत्री देसाई यांनी त्याला शाबसकी दिली. यावेळी त्यांनी महेश बरोबर झालेल्या चर्चेत त्याची व्यथा समजून घेतल्यावर मदत करण्याची ग्वाही दिली.
महेश साबळे हा मुंबईतील एका मिलमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. त्यावेळी त्याच्या शेजारी असलेल्या दोन पबना आग लागली. त्यावेळी अचानक लागलेल्या आगीत या पबमध्ये शेकडो नागरिक अडकले होते. त्यावेळी महेशने सातारी बाणा दाखवत आगीत घुसून पबचा दरवाजा तोडला. आत अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढताना स्वतःच्या जीवावर उदार होवून त्याने 200 जणांचा जीव वाचवला होता. त्याच्या धाडसाची प्रसार माध्यमे व सोशल मीडियावर दखल घेतल्यानंतर त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला होता.
त्यानंतर ही घटना विस्मृतीत जात असताना 25 जानेवारी रोजी त्याला राष्ट्रपतींकडून सर्वोत्तम जीवन रक्षा पदक जाहीर झाल्याची बातमी कळली. मात्र ते पदक घेण्यासाठी तो दिल्लीला जावू शकलेला नाही. मुळात त्याच्या घरची परिस्थिती बेताची असून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तो सुरक्षा रक्षक म्हणून मुंबईत काम करताना पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत आहे.
तरुण भारत ने घडवली मंत्रीमहोदयांशी भेट
आता शासनाने त्याच्या या पराक्रमाची दखल घेवून त्याला पोलीस दलात संधी देण्याची गरज व्यक्त झाल्याने दै. तरुण भारत चे आवृत्तीप्रमुख दीपक प्रभावळकर यांनी मंगळवारी सकाळी राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याशी भेट घडवून आणली. त्यांनी महेशच्या पदक व पराक्रमाची माहिती दिल्यानंतर मंत्री देसाई यांनी महेशच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकत त्याला मदत करण्याची ग्वाही दिली आहे. जीवावर उदार होवून पराक्रम करणाऱया महेशसारख्या जवानाला शासनाने नोकरीची संधी दिली पाहिजे, अशी भूमिका दीपक प्रभावळकर यांनी मंत्री देसाईंशी बोलताना मांडली.









