ऑनलाईन टीम / मुंबई :
भारताचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार एम. एस. धोनी आणि अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना या दोघांनी आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
धोनीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करत आपण निवृत्त होत असल्याचे जाहीर केले आहे. यामध्ये आपल्या भावना व्यक्त करताना धोनी म्हणाला, एवढे वर्ष दिलेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आपण सर्वांना धन्यवाद देत आहोत. या व्हिडिओमध्ये धोनीने ‘मे पल दो पल का शायर हूं’ हे गाणे ठेवले आहे.
2004 साली धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 2007 साली टी-20 वर्ल्ड कपमध्ये धोनीने पहिल्यांदाच भारताचे कर्णधारपद भूषवले. कर्णधार म्हणून आपल्या पहिल्यांदाच कर्णधारपद भूषवत असलेल्या धोनीने भारताला 2007 सालचा टी-20 वर्ल्ड कप, 2008 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये वनडे सीरिज आणि 2011 साली भारताला 50 ओव्हरचा वर्ल्ड कप जिंकून दिला. श्रीलंकेविरुद्धच्या फायनलमध्ये धोनीने मॅच विनिंग खेळी करत भारताला 28 वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकवून दिला. यानंतर 2013 सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफी मध्येही भारताचा विजय झाला तेव्हाही धोनी कर्णधार होता. आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकणारा धोनी हा एकमेव कर्णधार आहे.
धोनीने 350 वनडेमध्ये 50.58 च्या सरासरीने 10,773 रन केले, यामध्ये 10 शतके आणि 73 अर्धशतकांचा समावेश आहे. तर 98 टी-20 मॅचेसमध्ये धोनीने 37.6 च्या सरासरीने 1,617 रन केले आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये धोनीच्या नावावर 2 अर्धशतके आहेत. 2014 सालीच धोनीने टेस्ट क्रिकेटमधून अचानक निवृत्ती घेतली होती. 90 टेस्ट मॅचेसमध्ये धोनीने 38.09 च्या सरासरीने 4876 रन केले. यामध्ये 6 शतके आणि 33 अर्धशतकांचा समावेश आहे.
- धोनी पाठोपाठ सुरेश रैनाचीही निवृत्ती
एम. एस. धोनी पाठोपाठ त्याचा सहकारी सुरेश रैना याने देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले आहे. सुरेश रैनाने धोनी आणि टीम इंडियाच्या काही सहकाऱ्यांबरोबरचा एक फोटो शेअर करत आपली निवृत्ती घोषित केली.
रैनाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, धोनी तुझ्यासोबत खेळण्याचा आनंद वेगळाच होता त्यामुळे तू निवृत्ती घेतल्यावर मी ही तुझ्या या प्रवासात येण्याचा निर्णय घेत आहे. टीम इंडिया धन्यवाद! जय हिंद.
सुरेश रैना आंतरराष्ट्रीय क्रिकेट करियरमध्ये 18 टेस्ट मॅच, 226 वनडे सामने आणि 78 टी- 20 इंटरनॅशनल मॅचेसमध्ये खेळला आहे. रैनाने एक शतक आणि सात अर्धशतकच्या जोरावर टेस्ट क्रिकेटमध्ये 768 रन्स काढल्या आहेत. तर वनडेमध्ये रैनाने पाच शतके आणि 36 अर्धशतकी खेळ्या केल्या आहेत. यात 35 च्या सरासरीने 5615 रन काढले आहेत.