नागझर कुर्टी-फोंडा मतदान केंदावरील प्रकार

प्रतिनिधी /फोंडा
विधानसभा निवडणूकीच्या धर्तीवर नागझर कुर्टी फोंडा येथील एका मतदान केंद्रावर एका महिला व युवकाला मारहाणप्रकरणी मगो पक्षाचे फोंडय़ातील उमेदवार डॉ केतन भाटीकर यांच्याविरोधात फोंडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदविण्यात आली. सदर घटना काल सोमवारी दुपारी 3 वा. सुमारास बाबल्याखळी नागझर कुर्टी येथील मतदान केंद्रावर घडली.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिला मतदार सुवर्णा कंपाड यांनी रितसर तक्रार दाखल केली आहे. आपण एका महिला मतदाराला मतदान केंद्रातील नोंदणी क्रमांकाची पावती देत होती. यावेळी पैसे वाटत असल्याच्या संशयाने डॉ. केतन भाटीकर व अन्य आपल्या मागे धावून आले. यावेळी पोलीस कर्मचारीही उपस्थित होते. पोलीसासमक्ष पैसे वाटप करीत असल्याचे डॉ. केतन भाटीकर यांचा आरोपाचे तीने खंडण केले आहे. डॉ. केतन भाटीकर यांनी आपल्या गळय़ाला धरले, तसेच आपल्याबरोबर असलेल्या विजयकुमार पाल नामक युवकालाही शिवीगाळ, मारहाण व धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पिडीत दोघांही युवक व महिलेला फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच याप्रकरणी संशयित डॉ. केतन भाटीकर यांच्याविरोधात भा.दं.सं. 504, 506(2) व 323 गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अजामिनपात्र कलमामुळे संशयित भाटीकर याला आज अटक होण्याची शक्यता फोंडा पोलिसांनी वर्तविली असून उपनिरीक्षक साजिद पिल्ले अधिक तपास करीत आहे.
दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉ. केतन भाटीकर यांनी यासंदर्भात सर्व आरोप फेटाळून लावले आहे. मतदान केंद्रावर आपल चढता आलेख पाहून विरोधक वैफल्यग्रस्त झाले असल्याने आपल्याविरोधात महिलांना पुढे करून मारहाणीची तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी फोंडय़ाचे माजी आमदार रवी नाईक फोंडा पोलीस स्थानकात हजर राहिल्याबद्दलही भाटीकर यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.









