शिराळा पोलिसांची कारवाई
शिराळा/ प्रतिनिधी
शिराळा येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत हातचलाखीने महिलेला फसवणाऱ्या दोन चोरट्यांना चोवीस तासाच्या आत शिराळा पोलिसांनी अटक केली आहे. तर हे संशयित आरोपी याच दिवशी डिग्रज ता.वाळवा येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये याच पध्दतीने ८०००/रुपयांची हातचलाखीने फसवणूक करून शिराळ्याकडे आल्याचे निष्पन्न झाले असून शिराळा पोलिसांच्या सतर्कतेमुळे हे चोरटे अवघ्या चोवीस तासांत जेरबंद झाले.
याबाबत संजीवनी जयवंत मरळे (वय ४०) रा.रेड (ता.शिराळा) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांमधून मिळालेली माहिती अशी, सोमवारी दि. ४ रोजी दुपारी ३.१५ घ्या सुमारास शिराळा येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य शाखेत संजीवनी मरळे यांनी बचत गटाकडून २००००/हजार रुपये घेतले आहे. या कर्जाचे पैसे काढण्यासाठी त्या शिराळा शाखेत गेल्या होत्या. त्यावेळी संशयित आरोपी नबीलाल शहाजान ईरानी (वय४६) रा.ईरानी गल्ली, जयसिंगपूर व मिथुन अशोक काळे (वय३६) रा.नववी गल्ली, जयसिंगपूर यांनी संजीवनी यांना सदर नोटा फाटक्या व खोट्या असल्याचे सांगून त्यांच्याजवळील पैशाचा बंडल आपल्याजवळ घेतला. यामधील दोनशे रुपयाच्या २९ नोटा, पाच हजार आठशे रुपये हातचलाखीने लंपास केले. त्यानंतर उर्वरित नोटांचे बंडल संजीवनी यांच्या हातात सदर संशयितांनी दिले. व ते तिथुनच निघून गेले याच दरम्यान संजीवनी यांचे पती जयवंत मरळे हे बँकेत पैसे नेमण्यासाठी आले असता त्यांनी पैसे मोजले. त्यावेळी त्यात पाच हजार आठशे रुपये कमी असल्याचे त्यांना आढळून आले. यावेळी बँकेच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता. पैसे बरोबर दिले होते असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याच वेळी पैसे त्या दोन व्यक्तीने घेतले असावेत असा संशय संजिवनी यांना आला. त्यामुळे त्यांनी याबाबत शिराळा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
शिराळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून सदर घटनेची तात्काळ दखल घेऊन याचा तपास जलदगतीने सुरू केला. यावेळी खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार ते दोन आरोपी सराईत चोरटे असून जयसिंगपूर येथील रहिवाशी असल्याचे निष्पन्न झाले. शिराळा येथील पोलीसांचे एक पथक तात्काळ जयसिंगपूर मध्ये दाखल झाले.व नबीलाल शहाजान ईरानी श व मिथुन अशोक काळे यांना पोलिसांनी पहाटे तीनच्या सुमारास ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस हवालदार कालिदास गावडे, नितीन यादव, हरेश पितळे, अमर जाधव यांच्या पथकाने केली. अधिक तपास हरेश पितळे करत आहेत.