वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बेंगळूरमधील साई सेंटर येथे होणाऱ्या राष्ट्रीय हॉकी शिबिरासाठी हॉकी इंडियाने रविवारी 34 संभाव्य खेळाडूंची निवड केली असून 16 ऑक्टोबरपासून या शिबिराला सुरुवात होत आहे.
या राष्ट्रीय शिबिराची 22 ऑक्टोबर रोजी सांगता होणार आहे तर प्रतिष्ठेची महिला आशियाई चॅम्पियन्स करंडक स्पर्धा रांचीमध्ये 27 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. भारतात ही स्पर्धा पहिल्यांच आयोजित करण्यात आली असून त्यात विद्यमान चॅम्पियन चीन, जपान, कोरिया, मलेशिया व थायलंड यांचा समावेश आहे. या स्पर्धेत भारताची सलामीची लढत थायलंडविरुद्ध होणार आहे.
भारतीय संघाचे प्रमुख प्रशिक्षक यानेस स्कॉपमन म्हणाले की, या आठवडाभराच्या शिबिरात आवश्यक आढावा व सुधारणा यावर लक्ष केंद्रित करता येणार आहे. ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेपर्यंत होणारी प्रत्येक स्पर्धा आमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार असून सांघिक सुधारणा करण्याची आम्हाला मिळालेली ती संधीच असेल. रांचीमध्ये दाखल होण्याआधी हे छोटेसे शिबिर होत आहे. आशियाई स्पर्धेत आम्ही आमच्या कामगिरीचा आढावा घेऊ. अल्पसा ब्रेक घेऊन खेळाडू परतले असून मनाने ते काहीसे फ्रेश झाले असल्याने मायदेशातील आगामी आव्हान पेलण्यास ते सज्ज झाले आहेत, असेही स्कॉपमन म्हणाले.
संभाव्य खेळाडू : गोलरक्षक-सविता, रजनी एतिमर्पू, बिच्छू देवी, बांसरी सोळंकी. बचावफळी-दीप ग्रेस एक्का, गुरजित कौर, निक्की प्रधान, उदिता, इशिका चौधरी, अक्षता ढेकळे, ज्योती छेत्री, महिमा चौधरी. मध्यफळी-निशा, सलिमा टेटे, सुशीला चानू, ज्योती, नवज्योत कौर, मोनिका, मारिना कुजुर, सोनिका, नेहा, बलजीत कौर, रीना खोखर, वैष्णवी फाळके, अजमिना कुजुर. आघाडी फळी-लालरेमसियामी, नवनीत कौर, वंदना कटारिया, शर्मिला देवी, दीपिका, संगीता कुमारी, मुमताज खान, सुनेलिता टोपो, ब्युटी डुंगडुंग.









