उषा विश्वकर्मा अनेकींसाठी प्रेरणास्थान बनून गेली आहे. सध्याच्या बेभरवशी जगात महिलांना स्वतःचं संरक्षण करता यायला हवं. त्यांनी सक्षम व्हायलाच हवं. याच विचाराने प्रेरित होऊन उषा काम करते आहे. तिची रेड ब्रिगेड ही संस्था त्यासाठी काम करते. रेड ब्रिगेड ही नोंदणीकृत संस्था असून तिचे 100 सदस्य आहेत. महिलांवरील अत्याचारांची वाढती संख्या बघता उषाच्या कार्याचं मोल आपल्या लक्षात येतं. उषालाही एकदा अशा वाईट प्रसंगला सामोरं जावं लागलं होतं. गरीब कुटुंबातली उषा वंचित मुलांना शिकवायला जात असे. तिथेच एकदा तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी ती तिथून कशीबशी निसटली.
या घटनेचा उषाला खूप मोठा धक्का बसला. तिला नैराश्य आलं. ती जवळपास सहा महिने नैराश्यात होती. मात्र त्यातून बाहेर आल्यानंतर तिने स्वतःला सावरलं. या घटनेनंतर ती गप्प बसली नाही. असा प्रसंग कोणावरही येऊ नये किंवा आलाच तर महिलांना अशा प्रसंगांना सक्षमपणे सामोरं जाता यायला हवं असं तिला वाटत होतं. यासाठी काय करता येईल, असा विचार तिच्या मनात सुरू होता.आपण काहीच केलं नाही तर शिक्षणाचा काय फायदा, असं तिच्या मनात आलं. मग 2011 तिने रेड ब्रिगेडची मुहुर्तमेढ रोवली. तिने अत्याचाराला बळी पडलेल्या 15 मुलींना स्वसंरक्षणाचे धडे दिले. या ब्रिगेडच्या सदस्य मुली लाल कुर्ता आणि काळी सलवार घालतात. ही रेड ब्रिगेड
महिलांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. रेड ब्रिगेडच्या सदस्य शाळकरी मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देतात.
महिलांना निर्भय वातावरणात फिरता यावं असं उषाला वाटतं. स्वसंरक्षणाचे धडे घेतल्यानंतर महिला कोणतीही भीती न बाळगता वावरू शकतील, असं तिचं म्हणणं आहे. म्हणूनच अधिकाधिक मुलींना रेड ब्रिगेडचं सदस्यत्व देण्यासाठी ती झटत असते. या ब्रिगेडने मार्शल आर्टची तंत्र विकसित केली आहेत. या तंत्राला निःशत्र असं नाव देण्यात आलं आहे. उषाने सरकारच्या कवच मिशन अंतर्गत 56,000 महिलांना मार्शल आर्टस शिकवलं आहे. यासोबतच ती विविध संस्थांशी जोडली गेली आहे. तिथल्या महिलांनाही ब्रिगेडतर्फे संरक्षणाचे धडे दिले जातात. महिलांवरील अत्याचारांविरोधात जागरूकता निर्माण करण्यासाठी उषाने जवळपास 700 पथनाटय़ं सादर केली आहेत. यासोबतच 225 सेमिनार्सच्या माध्यमातून महिलांना मार्शल आर्ट्सचं महत्त्व पटवून दिलं आहे. सध्याचा काळ बघता महिलांनी स्वसंरक्षणाचे धडे घेणं खूप गरजेचं आहे, यात शंका नाही.









