पिंपरी / प्रतिनिधी :
महिला सक्षम होणार नाहीत, तोपर्यंत देश प्रगती करू शकत नाही. जगाच्या पाठीवरील प्रत्येक प्रगत देशाने महिलांना सक्षम करूनच प्रगती साधली. महिला अर्थव्यवस्थेला थेटपणे जोडल्या जातात. त्यावेळेसच अर्थव्यवस्थेला चालना मिळते आणि या माध्यमातून आर्थिक विकासाचा दर दुपटीने वाढवू शकतो, असे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
भोसरीतील गावजत्रा मैदानात शिवांजली सखी मंचच्या माध्यमातून आयोजित इंद्रायणी थडी जत्रेचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले, महिलांना आर्थिकदृष्टय़ा सक्षम करण्याकरिता बचत गटांची एक मोठी चळवळ उभी राहणे गरजेचे आहे. 2014 साली राज्यातील केवळ साडेतीन लाख महिलांची कुटुंबे बचतगटाच्या चळवळीशी जोडली गेली होती. आम्ही साडेतीन लाखांवरून 40 लाख कुटुंबे बचतगटांशी जोडली. त्याच्या माध्यमातून सक्षमीकरण केले. वेगवेगळय़ा व्यासपीठावरून बाजारातून त्यांना त्यांची वस्तू विक्रीची व्यवस्था करुन दिली. त्यातून महिला सक्षमीकरणाचा एक मार्ग तयार झाला.









