वृत्तसंस्था/ नवी मुंबई
व्हिएतनामच्या महिला फुटबॉल संघाने आगामी फिफाच्या महिला विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठी आपली पात्रता पहिल्यांदाच सिद्ध करण्याचा नवा विक्रम केला. येथे रविवारी झालेल्या प्लेऑफ सामन्यात व्हिएतनामने चिनी तैपेईचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव केला.
आता 2023 साली ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्या संयुक्त यजमानपदाने होणाऱया महिलांच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेचे व्हिएतनामने तिकीट पहिल्यांदाच आरक्षित करण्याचा नवा इतिहास घडविला. रविवारच्या सामन्यात व्हिएतनामतर्फे चुआँग कियूने पहिला गोल तर नेगुयेन थुईने दुसरा आणि निर्णायक गोल केला. चिनी तैपेईतर्फे सु ए युसेनने एकमेव गोल नोंदविला. महिलांच्या एएफसी आशिया चषक फुटबॉल स्पर्धेत व्हिएतनाम, चिनी तैपेई आणि थायलंड या संघांनी आपले उपांत्यपूर्व फेरीचे सामने गमविल्यानंतर त्यांना प्ले ऑफ लढतीत खेळावे लागले होते. रविवारच्या सामन्यातील पराभवामुळे चिनी तैपेई आणि थायलंड या दोन संघांना आंतर कॉन्फेडरेशन स्पर्धेतींल प्ले ऑफ गटात खेळावे लागणार आहे. प्ले ऑफ गटातील सामन्यात विजयी ठरणारा संघ तब्बल 31 वर्षांनंतर महिलांच्या विश्वकरंडक स्पर्धेसाठी पात्र ठरेल.
एएफसी आशिया चषक फुटबॉल स्पर्धेतील येथे शुक्रवारच्या सामन्यात चिनी तैपेईने थायलंडचा पराभव करून प्लेऑफ गटात स्थान मिळविले होते. त्यांचा प्लेऑफ गटातील सामना व्हिएतनाम बरोबर निश्चित झाला होता. रविवारचा सामना बरोबरीत राखला असता तर चीन तैपेईला पुढे वाटचाल करता आली असती. व्हिएतनामने गेल्या बुधवारी झालेल्या सामन्यात थायलंडचा 2-0 असा पराभव केला होता.








