स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह , साखरतरमध्ये आरोग्य मोहिम गतीमान
प्रतिनिधी/ रत्नागिरी
साखरतर येथील कोरोनाग्रस्त महिलेच्या जावेचा अहवालही पॉझीटीव्ह आल्याने जिल्हय़ातील कोरोनाग्रस्तांची संख्या पाचवर पोहचली आहे. साखरतरमधील महिला कोरोना पॉझीटीव्ह असल्याचे मंगळवारी स्पष्ट झाल्यानंतर तिच्या तिच्या कुटुंबातील 15 जणांना क्वारंटाईन करण्यात आले होत. यातील 10 जण निगेटीव्ह असून तिच्या जावेचा रिपोर्ट मात्र पॉझिटीव्ह आला आहे. साखरतरमध्ये दुसरी महिला कोरोनाग्रस्त आढळल्याने आरोग्य विभागाचे संपूर्ण लक्ष साखरतरकडे केंद्रीत केले असून घरोघरी तपासणी मोहिम हाती घेण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक बोल्डे यांनी दिली.
नव्या रूग्णामुळे रत्नागिरी जिल्हय़ात कोरोनाग्रस्तांची संख्या आता 5 वर पोहलची आहे. यामध्ये खेड येथील एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. तर गुहागर शृंगारतळी येथील रूग्ण पूर्णपणे बरा झाल्याने गुरूवारी त्याला डिस्चार्ज देण्यात आला. आता जिल्हा शासकीय रूग्णालयात 3 पॉझिटीव्ह रूग्णांवर आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत.
साखरतरमध्ये मंगळवारी पॉझीटीव्ह आढळलेल्या महिलेवर उपचार करणाऱया दोन खाजगी डॉक्टरांनाही क्वारंटाईन करण्यात आले होते. यातील एका डॉक्टरचा रिपोर्ट निगेटीव्ह आला असून दुसऱया डॉक्टरचा रिपोर्ट येणे बाकी असल्याचे डॉ. बोल्डे यांनी सांगितले.
साखरतर गावात एकाच कुटुंबातील दोन महिला कोरोना पॉझीटीव्ह आढण्ल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहीले आहे. याच कुटुंबातील इतर 10 जणांचे रिपोर्ट मात्र निगेटीव्ह आल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. या दोन्ही महिलांमध्ये कोणाच्या संपर्कातून कोरोनाचे सक्रमण झाले, तसेच त्या आणखी कोणाच्या संपर्कात आल्या याची माहिती प्रशासनाकडून घेतली जात आहेत. आणखीन काही संशयितांना क्वारंटाईनसाठी प्रशासनाकडून ताब्यात घेतले जात आहे.








