ब्रेन्टफोर्ड/ वृत्तसंस्था
महिला युरो चषक फुटबॉल स्पर्धेत जर्मनीने स्पेनचा 2-0 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले. त्यांनी स्पेनविरुद्ध विजयासह ब गटातील अव्वलस्थान आपल्याकडे राखले. सामन्यातील दोन्ही गोल पहिल्याच सत्रात केले, ते जर्मनीच्या विजयाचे वैशिष्टय़ ठरले. तिसऱया मिनिटाला कियाराने तर 36 व्या मिनिटाला अलेक्झांड्रा पॉपने प्रत्येकी एक गोल करत जर्मनीच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. स्पेनला या लढतीत ऍलेक्झिया व जेनिफर यांची उणीव प्रकर्षाने जाणवली. जर्मनीची साखळी फेरीतील शेवटची लढत शनिवारी फिनलंडविरुद्ध होईल. फिनलंडचे स्पर्धेतील आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले आहे.









