वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लखनौतील भारतीय क्रीडा प्राधिकरण मंडळाच्या (साई) केंद्रामध्ये देशातील महिला मल्लांसाठी राष्ट्रीय कुस्ती सराव शिबिराला 10 ऑक्टोबरपासून प्रारंभ करण्याचा निर्णय अखिल भारतीय कुस्ती फेडरेशनने घेतला आहे. या सराव शिबिरात सर्व महिला मल्लांना सहभागी होण्याची सक्ती असून ज्या महिला मल्ल या शिबिरात दाखल होणार नाहीत, त्यांचा राष्ट्रीय संघ निवडीवेळी विचार केला जाणार नाही, असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
महिला मल्लांसाठी राष्ट्रीय कुस्ती सराव शिबीर 1 सप्टेंबरपासून घेण्याचे यापूर्वी ठरले होते. पण देशातील कोरोनाची स्थिती चिंताजनक झाल्याने सदर शिबीर लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान टोकियो ऑलिंपिकसाठी आतापर्यंत चार मल्ल पात्र ठरले असून त्यापैकी विनेश फोगट आणि दीपक पुनिया यांना कोरोनाची बाधा झाल्याने उर्वरित मल्लांची स्थिती चलबिचल झाली. कोरोना परिस्थितीचा अभ्यास केल्यानंतर भारतीय क्रीडा प्राधिकरण मंडळ आणि अखिल भारतीय कुस्ती फेडरेशन यांनी महिला मल्लांसाठी राष्ट्रीय कुस्ती सराव शिबीर घेण्याचे निश्चित केले. ऑलिंपिकसाठी 50, 53, 57, 62, 68 आणि 76 किलो या सहा विविध वजन गटातील मल्लांसाठी हे शिबीर घेतले जाणार असून 31 डिसेंबरला या शिबिराची सांगता होणार आहे. साईतर्फे देशातील क्रीडा हालचालींना 5 ऑक्टोबरपासून फेरसुरूवात करण्याचा निर्णय साईने घेतला असून नऊ विविध क्रीडाप्रकारामध्ये कुस्तीचा समावेश आहे. 5 ऑक्टोबरपासून ‘खेलो इंडिया फिर से’ मोहिमेला प्रारंभ करण्यात येणार आहे. लखनौमध्ये 10 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱया महिला मल्लांच्या राष्ट्रीय कुस्ती सराव शिबिरात विविध सहा वजन गटातील प्रत्येकी तीन मल्ल असे एकूण 18 महिला मल्ल सहभागी होणार असल्याची माहिती कुस्ती फेडरेशनचे सचिव विनोद तोमर यांनी दिली.
या शिबिरात दाखल होण्यापूर्वी महिला मल्लांना 14 दिवसांसाठी क्वारंटाईनमध्ये रहावे लागेल. सराव सुरू होण्यापूर्वी त्यांची कोरोना चांचणी घेतली जाईल. या चांचणीत ते निगेटिव्ह असतील तर त्यांना शिबिरात दाखल होण्याची परवानगी दिली जाईल. पुरूष मल्लांच्या सराव शिबिराला चालू महिन्याच्या प्रारंभी सोनेपत येथे सुरूवात झाली असून हे शिबीर 31 डिसेंबरला संपणार आहे.









