विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱयांनी केली निदर्शने
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना काळात आम्ही रात्रंदिवस काम केले. कोरोनासारख्या भयानक आजारात काम करताना 173 अंगणवाडी महिला कर्मचाऱयांना कोरोना झाला. त्यामधील 28 जणींचा मृत्यू झाला. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांना कोणत्याच सुविधा तसेच आर्थिक नुकसानभरपाई देण्यात आली नाही. यासह इतर मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी महिलांनी सीटूच्या नेतृत्वाखाली महिला व बाल कल्याण खात्याच्या कार्यालयावर मोर्चा काढून जोरदार निदर्शने केली.
अंगणवाडी कर्मचारी महिलांचे वेतन कमी करण्यात आले आहे. त्यामुळे महिला अडचणीत आल्या आहेत. महिला आणि बाल कल्याण खात्याच्या माध्यमातून विविध प्रकारची कामे आम्ही केली आहेत. याचबरोबर आरोग्य खात्याच्या नेतृत्वाखालीही काम केले असून आम्हाला कोणत्याच प्रकारच्या सुविधा देण्यात आल्या नाहीत. तेव्हा तातडीने आमच्या मागण्या मान्य करून आम्हाला वेळेत वेतन द्यावे, अशी मागणी करण्यात आली.
महिला आणि बाल कल्याण खात्याच्या कार्यालयावर मोर्चा काढून हे निवेदन देण्यात आले. यावेळी सीटूच्या अध्यक्षा मंदा नेवगी, मिनाक्षी डफळे, गीता अतिवाडकर, लता धामणेकर, लक्ष्मी मेलगे, शकुंतला अष्टेकर, पूनम बाबली, सुप्रिया पाटील, हेमा गोरल, मंगल देसाई, गीता मोटराचे, हेमलता पाटील, कांचन गडकरी, प्रभावती नंदी, सविता मठपती, लीला राजाई यांच्यासह कर्मचारी महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.









