कुर्डुवाडी : प्रतिनिधी
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मध्य रेल्वेने बंगलोर-मुंबई उद्यान एक्सप्रेसचे स्टेअरींग सोलापुर ते दौंड महिलांच्या हाती देऊन महिलांचा सन्मान केला. या उद्यान एक्सप्रेस (११३०२) च्या लोकोपायलट अनिता राज व सहा लोकोपायलट भावना कोष्टा या होत्या. तर गार्ड(ट्रेन मॅनेजर) म्हणून वैशाली भोसले या काम पहात होत्या. यावेळी महिला कर्मचाऱ्यांनीही उत्साहात आपल्या पदाचा पदभार स्वीकारून नवे आव्हान यशस्वीरीत्या पेलण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.
पुरुषांची विविध क्षेत्रात असलेली मक्तेदारी संपवत आज स्त्रियाही अनेक क्षेत्रात अग्रेसर झाल्या आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नव्हे तर आज स्त्रीया पुरुषांपेक्षा एक पाऊल पूढेच आहेत. सर्वच क्षेत्रात आपलं कर्तृत्व सिद्ध करीत आहेत. मंगळवार दि. ८ जागतिक महिला दिन यानिमित्ताने सोलापुर विभागातील महिला लोकोपायलट अनिता राज व सहा लोकोपायलट भावना कोष्टा तर गार्ड वैशाली भोसले यांनी बंगलोर-मुंबई उद्यान एक्सप्रेसचा ताबा घेत हिरवा झेंडा दाखवत सोलापुर ते दौंड अशी ही रेल्वे चालवली. गाडी कुर्डुवाडी स्थानकात दु. १२ वा. आली त्यावेळी कर्तव्यावर असणाऱ्या लोकोपायलट, सहा.लोकोपायलट व गार्ड यांना कुर्डुवाडी जंक्शनच्यावतीने बुके देऊन सत्कार करण्यात आला. दहा मिनिटांचा थांबा घेत ही एक्सप्रेस गाडी पुढील प्रवासासाठी दौंडच्या दिशेने मार्गस्थ झाली. यावेळी त्यांच्या सोबत लोको इन्स्पेक्टर साजिद शेख हे होते.









