दिल्लीत नव्याने सीरो सर्वेक्षण : समूह प्रतिकारक्षमतेपासून अद्याप खूप दूर : प्रत्येक 4 पैकी एक दिल्लीवासीय कोरोनामुक्त
दिल्लीच्या लोकांमध्ये कोविड-19 अँटीबॉडीजच्या स्थितीत फारशी विशेष वाढ दिसून आलेली नाही. सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये केवळ 0.4 टक्के अधिक सीरोप्रविलेंस मिळाले आहे. नव्या अहवालानुसार दिल्लीच्या 25.5 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज आहेत, म्हणजेच प्रत्येक 4 पैकी एक दिल्लीवासीय कोरोनाच्या संपर्कात आला असून त्यातून बराही झाला आहे. महिला आणि वृद्धांमध्ये अधिक सीरोप्रिवेलेंन्स दिसून आले आहे. शहरी झोपडपट्टय़ांमध्येही उर्वरित ठिकाणांपेक्षा अधिक सीरोप्रिवेलेन्स आहे. अहवालानुसार दिल्लीत अद्याप कोविड संक्रमणाने टोक गाठलेले नाही. समूह प्रतिकारक्षमतेपासून (हर्ड इम्युनिटी) दिल्ली सध्या खूपच दूर आहे.
कुठे वाढ तर कुठे घट
जिल्हानिहाय आकडेवारी पाहिल्यास मध्य दिल्लीत सर्वाधिक 49.5 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज मिळाल्या आहेत. उत्तर-पश्चिममध्ये सप्टेंबरच्या तुलनेत सीरोप्रिवेलेन्समध्ये घट झाली आहे, तर असेच चित्र दक्षिण, उत्तर आणि पूर्व दिल्लीतही दिसून आले आहे. शहादरा जिल्हय़ात 31 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या आहेत. तर उत्तर-पश्चिम दिल्लीत 30.8 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज दिसून आल्या आहेत. दक्षिण दिल्लीत 28.1 टक्के, पूर्व दिल्लीत 24.8 टक्के, पश्चिम दिल्लीत 21.2 टक्के, नवी दिल्लीत 19.8 टक्के, ईशान्य दिल्लीत 19.2 टक्के, दक्षिण-पश्चिम दिल्लीत 18.5 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज सापडल्या आहेत. संक्रमणाला बराच काळ लोटल्यावर अँटीबॉडीज कमी होत असल्याने अशी स्थिती उद्भवली असण्याची शक्यता आहे.
50 पेक्षा अधिक वयोगटात सीरोप्रिवेलेंस
वयोमानाच्या दृष्टीकोनातून आतापर्यंत झालेल्या सीरो सर्वेक्षणाचा विदा (डाटा)पाहिल्यास 50 हून अधिक वयोगटाच्या 29.8 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज मिळाल्या आहेत. तर 18 ते 49 या वयोगटातील केवळ 24.3 टक्के लोकांमध्येच सीरोप्रिवेलेन्स मिळाली आहे.
26.1 टक्के महिलांमध्ये अँटीबॉडीज
ऑक्टोबरच्या सर्वेक्षणात एकूण 15,015 लोकांना सामील करण्यात आले होते. यातील 7,011 नमुने महिलांचे होते. त्यांच्यापैकी 26.1 टक्के महिलांमध्ये अँटीबॉडीज मिळाल्या आहेत. तर दिल्लीतील पुरुषांमध्ये सीरोप्रिवेलेंस 25 टक्के राहिली आहे.
कंटेन्मेंट झोनमध्ये सीरोप्रिवेलेंसमध्ये घट
सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये कंटेन्मेंट झोन्समध्ये सीरोप्रिवेलेन्स वाढली आहे, परंतु हे प्रमाण ऑगस्टच्या 32.7 टक्क्यांच्या तुलनेत खूपच कमी आहे. तर नियोजित नागरी वस्त्यांमध्ये सीरोप्रिवेलेन्स 25.2 टक्के राहिली आहे. गावांमध्ये 22.3 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज मिळाल्या आहेत. शहरी झोपडट्टय़ांमध्ये 27.2 टक्के सीरोप्रिवेलेन्स दिसून आले. अनधिकृत वस्त्यांमध्ये हा आकडा 24 टक्के इतका आहे.









