मणिपूरच्या कीरेम्बिखोक गावाची अनोखी कथा, 80 टक्के महिला फर्निचर निर्मितीच्या क्षेत्रात
मणिपूरची राजधानी इम्फाळपासून 32 किलोमीटर अंतरावरील तोबल जिल्हय़ात कीरेम्बिखोक हे गाव आहे. सुमारे 1500 लोकसंख्या असलेल्या या गावातील 80 टक्के महिला कारपेंटर (सुतारकाम)चे काम करतात. फर्निचरपासून दरवाजे-चौकट निर्माण करण्याचे काम त्या करत आहेत. हे काम त्या विविध पाळय़ांमध्ये करत असतात.
घरकाम झाल्यावर सकाळी 7 ते 11 आणि दुपारी दीड ते 5 वाजेपर्यंत त्यांचे काम चालते. याच्या बदल्यात दरमहिन्याला 8 ते 10 हजार रुपयांची कमाई त्यांना प्राप्त होते. या गावाची आणखी एक ओळख आहे. येथे कुणीच बेरोजगार नाही. पतीसोबत कामात भाग घेतल्याने कुटुंबाचे उत्पन्न दुप्पट झाले असून गावातील प्रत्येक सदस्य मुलामुलींना उज्ज्वल भविष्य देण्याचा प्रयत्न करत आहे. गावातील प्रत्येक मूल शाळेत जाते आणि हे गाव पूर्णपणे व्यसनमुक्त आहे.

20 वर्षांपूर्वी माझे पती कारपेंटर म्हणून काम करायचे, त्यांच्या एकटय़ाच्या कमाईतून घरखर्च पूर्णपणे भागत नव्हता. शेतांमध्ये काम न मिळाल्याने कारखान्यात पतीला मदत करण्याचा निर्णय घेतला. कारखान्याचे मालक कांगजम इनाओबी यांच्याकडे काम मागितले आणि त्यांनी होकार देताच काम सुरू केल्याची माहिती गावातील अहोमसांगबाम राधामणि सांगतात. आठवडाभरातच गावातील 5-6 अन्य महिलांनी तेथे काम सुरू केले आणि आज बहुतांश महिला हे काम करत आहेत.
महिलांनी हे केवळ पुरुषांचे काम आहे असे मानले आहे. पतीसोबत सुतारकाम शिकून त्यांनी पुरुषांच्या तुलनेत मागे नसल्याचे सिद्ध करून दाखविले आहे. गावातील प्रत्येक कुटुंब आता 20 हजार रुपयांपेक्षा अधिक कमाई करत असल्याचे फर्निचर कंपनीचे मालक कांगजम म्हणाले.
स्वकमाईतून कर्जाची परतफेड
गावातील एका व्यक्तीच्या निर्धाराने पूर्ण गावाचे चित्र पालटले आहे. महिला आता स्वयंसहाय्य गटाकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड स्वतःच्या कमाईतून करत आहेत. मुलांना राजधानीतील वसतिशाळांमध्ये शिकवत आहेत असे उद्गार कीरेम्बिखोकचे ग्रामस्थ सेलाइबाम जीवन यांनी काढले आहेत.









