पणजी/प्रतिनिधी
20 व्या शतकाच्या पूर्वार्धात युरोपमध्ये अस्तित्वासाठी संघर्ष करत समाजात आपला आवाज शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलांच्या आयुष्यात डोकावण्याची संधी ‘मॉरल ऑर्डर’ हा चित्रपट देतो. गोव्यातील पणजी येथे 51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (आयएफएफआय) वर्ल्ड पॅनोरमा विभागात, मारिओ बरोसो यांच्या ‘मॉरल ऑर्डर’ या पोर्तुगीज चित्रपटाचा काल वर्ल्ड प्रीमिअर पार पडला.
1918 मध्ये, मारिया ऍडलेड कोल्हो, जी एका प्रसिद्ध वृत्तपत्राची वारसदार आणि मालक होती , सामाजिक, सांस्कृतिक आणि कौटुंबिक ऐषोरामापासून दूर जाण्याच्या प्रयत्नात आपल्यापेक्षा वयाने 22 वर्षांनी लहान असलेल्या गाडीचालकाबरोबर पळून गेली. मारियाची भूमिका प्रख्यात पोर्तुगीज अभिनेत्री मारिया डी मेडीरोसने साकारली आहे.
पणजी येथे आज, 22,जानेवारी 2021 रोजी स्क्रिनिंगनंतर पत्रकार परिषदेत बोलताना अभिनेत्री वेरा मौरा जिने मारियाची सेवा करणार्या मोलकरणीची भूमिका साकारली आहे, ती म्हणाली: “हा चित्रपट प्रामुख्याने 20 व्या शतकातील युरोपियन समाजात आपला आवाज शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलांचा आहे . पोर्तुगालमध्ये घडलेल्या एका सत्य कथेवर हा आधारित आहे. हा चित्रपट स्त्रीच्या स्वातंत्र्याबद्दल आहे , ज्यामध्ये त्या काळात एका स्त्रीने धाडसी पाऊल उचलण्याचे धैर्य दाखवले. ती पोर्तुगालमधील सर्वात श्रीमंत कुटुंबातील आहे आणि ती तो उच्चभ्रू समाज सोडून जाते.”
अभिनेता जोआओ पेड्रो मामेडी, ज्याने मारिया नव्या आयुष्यासाठी ज्याच्याबरोबर पळून जाते त्या गाडीचालक मॅन्युएल क्लॅरोची भूमिका साकारली आहे. तो देखील या पत्रकार परिषदेला उपस्थित होता. त्याने जीवनातील जटिल परिस्थितीबद्दल भाष्य केले ज्यामुळे तिला हे पाऊल उचलावे लागले. “सर्व पात्र मुख्य पात्र मारियाभोवती ओढलेली आहेत. प्रत्येकजण तिच्या गरजा आणि इच्छा याद्वारे तिच्याशी जोडलेला आहे. अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे ती तिच्या आधीच्या सामाजिक वातावरणापासून दूर जाते. बदला , प्रेम किंवा वेडेपणामुळे झालेले असू शकते. हे करण्यासाठी ती कशी प्रवृत्त झाली हे समजून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पहावा लागेल. “
चित्रपटाचे दिग्दर्शक मारिओ बरेसो हे एक सर्वोत्कृष्ट आणि सर्वात लोकप्रिय पोर्तुगीज छायाचित्रण दिग्दर्शक मानले जातात आणि त्यांनी अनेक नामांकित दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. त्यांनी लघुपट, माहितीपट, दूरचित्रवाणी कार्यक्रम, चित्रपट आणि तीन चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.