कोल्हापूर / राजेंद्र होळकर
टेंबलाई नाका झोपडपट्टीत सुरु असलेल्या महिलांच्या जुगार अड्यावर पोलिसांनी छापा टाकला. अड्डा मालकीसह जुगार खेळणाऱ्या पाच महिला आणि दोन युवक अशा आठ जणांना अटक केली. त्याच्याकडून सहा हजार पन्नास रुपयांची रोकड, दोन मोबाईल संच, जुगाराचे साहित्य अशा १४ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हे सर्व जण अंदर – बाहर नावाचा जुगार खेळत होते.
अटक केलेल्यांच्यामध्ये अड्डा मालकीन शोभा संजय हेगडे (वय ३९, रा. झेंडा चौक वसाहत, कागल), निलम विजय कांबळे (वय ३०, मणेर मळा, उंचगाव, ता.करवीर), वर्षा इकबाल लोंढे ( वय ३०), दिपाली आकाश लोंढे (वय २०, दोघी रा. टाकाळा झोपडपट्टी, कोल्हापूर), भिंगरी अविनाश सकट (वय ४०, रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर), सुरेखा राजू नरंदेकर (वय ३७, रा.टेबलाई नाका, कोल्हापूर), सुनिल संभाजी जाधव (वय ३८, रा. घोडके चाळ, टेबलाई नाका, कोल्हापूर), करीम मोहिद्दिन खान (वय ३८, रा. ओमसाई पार्क, साई मंदिरजवळ, उंचगाव, ता. करवीर ) या आठ जणांचा समावेश आहे.

पोलिसांच्याकडून मिळालेली माहिती अशी, टेबलाई नाका झोपडपट्टीमध्ये महिलांच्या अंदर – बाहर नावाचा जुगार अड्डा सुरु असल्याबाबतची माहिती बातमीदाराकडून मिळाली. त्यानूसार या अड्यावर सोमवारी दुपारी छापा टाकला. त्यावेळी या जुगार अड्यामध्ये अड्डा मालकीन शोभा हेगडेसह पाच महिला आणि दोन युवक जुगार खेळत असल्याचे मिळून आले. त्यासर्वाना अटक केली. त्याच्याकडून सहा हजार पन्नास रुपयांची रोकड, दोन मोबाईल संच, जुगाराचे साहित्य अशा १४ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शहर पोलीस उपाधीक्षक प्रेरणा कट्टे, राजारामपूरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नवनाथ घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली राजारामपूरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली.
कोल्हापूरातील पहिली कारवाई
पोलिसांनी आतापर्यत गावठी हातभट्टीची मालकीन, गावठी हातभट्टीच्या दारु गुता चालविणाऱ्या, मटका घेणाऱ्या महिलांना अटक केली आहे. प्रथमच महिला जुगार मालकीसह जुगार खेळणाऱ्या पाच महिलांना अटक केली आहे. या कारवाईने शहरात महिला जुगार खेळतात हे उघड झाले असून, महिलाकरीता जुगार अड्डे सुरु असल्याचे वास्तव समोर आले आहे.








