कोरोनाची दुसरीच लाट मुलांना बाधक ठरत असल्याचे स्पष्ट : मुलांमधील मृत्यूचे प्रमाण कमी : 20 एप्रिल ते 20 मेपर्यंतची आकडेवारी
प्रतिनिधी / बेंगळूर
कोरोनाची तिसरी लाट मुलांना घातक ठरू शकते, असा इशारा तज्ञांनी दिला आहे. परंतु कोरोनाची दुसरी लाट मुलांना बाधक ठरत असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. दुसऱया लाटेमध्ये केवळ एका महिन्यात 40 हजार मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. मात्र, समाधानकारक बाब म्हणजे मुलांमधील मृत्यूचे प्रमाण कमी आहे. राज्यात 20 एप्रिल ते 20 मेपर्यंत नऊ वर्षाखालील 38 हजार 994 मुलांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यापासून 407 दिवसांमध्ये 29 हजार मुलांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, गत 30 दिवसांत (कोरोनाच्या दुसऱया लाटेत) 40 हजार मुले कोरोनाबाधित झाली आहेत. त्यानुसार कोरोनाच्या दुसऱया लाटेत बाधित झालेल्या मुलांपैकी गत महिन्याभरातच 58 टक्के मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या आकडेवारीतून तिसरी लाट येण्यापूर्वीच दुसरी लाट मुलांना बाधक असल्याचे स्पष्ट होत आहे.
राज्यात 20 एप्रिल ते 20 मेपर्यंत नऊ वर्षाखालील 38 हजार 994 मुलांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 20 मे 2021 पर्यंत राज्यात 23.35 लाख जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये 9 वर्षाखालील 68,635 तर 10 ते 19 वर्षाखालील 1.73 लाख मुलांचा समावेश आहे. 9 वर्षाखालील 43 व 10 ते 19 वर्षाखालील 63 मुलांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. गत महिन्याभरात या वयोगटातील मुलांमध्ये कोरोना संसर्ग वेगाने होत आहे.
बाधितांचे प्रमाण 18 टक्क्यांनी वाढले
राज्यात 8 मार्च 2020 पासून 19 एप्रिल 2021 पर्यंत 9 वर्षाखालील 29,641 आणि 10 ते 19 वर्षाखालील 73,846 मुलांना कोरोनाची बाधा झाली होती. या 407 दिवसांच्या कालावधीत दररोज सरासरी 73 मुलांना कोरोना होत असल्याचे आढळून आले होते. मात्र, या 407 दिवसांच्या तुलनेत गत 30 दिवसांत बाधितांचे प्रमाण 18 टक्क्यांनी वाढले आहे. 19 एप्रिल 2021 पर्यंत 29 मुलांचा कोरोनाने बळी घेतला होता. त्यानंतरच्या कालावधीत 14 मुलांचा मृत्यू झाला आहे. गत महिन्याभरात 2 दिवसाला एका मुलाचा मृत्यू झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.
एका महिन्यात मुलांच्या मृत्यूची टक्केवारी 0.035 इतकी राहिली आहे. तर यापूर्वी 19 एप्रिलपर्यंत 0.097 टक्के होती. 10 ते 19 वर्षाखालील मुलांच्या मृत्यूचे प्रमाण 0.062 टक्के इतके राहिले आहे. तर 19 एप्रिलपूर्वी 0.017 टक्के होती. कोरोनाची बाधा झालेले बहुतेक रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. मुले त्यांच्या प्राथमिक संपर्कात येत असल्याने संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. घरात आयसोलेशन झालेले रुग्ण नियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.
उपाययोजना…
मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास त्यांची ऑक्सिजन पातळी तपासली पाहिजे. दर 8 तासांनी थर्मामीटरने शरीराचे तापमान मोजावे. जर श्वसनाचा दर प्रतिमिनिट 40 च्या वर, नाडीचा दर प्रतिमिनिट 120 पेक्षा जास्त असेल आणि ऑक्सिजनची पातळी 95 च्या खाली असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधावा. ताप किंवा उलटय़ा असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे तज्ञांनी सांगितले आहे.









