वृत्तसंस्था/ दुबई
भारतीय वंशाचा अमेरिकन क्रिकेटपटू जसकरण मल्होत्रा याला आयसीसीकडून सप्टेंबर महिन्यांतील सर्वोत्तम पुरुष खेळाडूंसाठी नामांकन मिळाले आहे. यासाठी आयसीसीने तीन खेळाडूंना नामांकन दिले आहे.
गेल्या महिन्यात जसकरणने आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यात अमेरिकेकडून खेळताना एका षटकात सहा षटकार ठोकण्याचा पराक्रम करणारा चौथा फलंदाज होण्याचा मान मिळविला. या पुरस्कारासाठी बांगलादेशचा नसुम अहमद व नेपाळचा लेगस्पिनर संदीप लामिच्छने यांनाही नामांकन मिळाले आहे. महिलांमध्ये या पुरस्कारासाठी इंग्लंडची कर्णधार हीदर नाईट, तिचीच सहकारी चार्ली डीन व दक्षिण आफ्रिकेची लिझेली ली यांचे नामांकन झाले आहे.
31 वर्षीय जसकरण मल्होत्रा चंदिगडचा रहिवासी असून 19 वर्षांखालील वयोगटात त्याने हिमाचल प्रदेशचे नेतृत्व केले होते. 9 सप्टेंबर रोजी ओमानमध्ये झालेल्या विश्वचषक लीग 2 मधील पापुआ न्यूगिनियाविरुद्धच्या सामन्यात त्याने सहा षटकार नोंदवताना नाबाद 173 धावा फटकावल्या होत्या. आतापर्यंतच्या 6 वनडेत त्याने 87 धावांच्या सरासरीने व 104.40 च्या स्ट्राईक रेटने 261 धावा जमविल्या आहेत.
न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात झालेल्या टी-20 मालिकेत बांगलादेशच्या नसुम अहमदने अचूक फिरकी माऱयावर पाहुण्यांना जेरीस आणले होते. त्याने या मालिकेत 8 बळी मिळविले. त्यापैकी चौथ्या सामन्यात त्याने 10 धावांत 4 बळी मिळविले होते. बांगलादेशने ही मालिका 3-2 अशा फरकाने जिंकली. नेपाळच्या लामिच्छनेने यापूर्वीच जादुई फिरकीने आपली क्षमता दाखवून दिलेली आहे. वर्ल्ड कप लीग 2 मध्येही त्याने ही कामगिरी कायम ठेवताना 6 वनडेत 7.38 च्या सरासरीने 18 बळी मिळविले. पापुआ न्यूगिनियाविरुद्ध त्याने 11 धावांत 6 बळी मिळवित सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
चार्ली डीनने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत 10 बळी मिळविले. तिच्या ऑफब्रेकच्या जोरावर इंग्लंडने ही मालिका 4-1 अशी एकतर्फी जिंकली. इंग्लंडची कर्णधार हीदर नाईटने अष्टपैलू कामगिरी करताना पाच सामन्यात 214 धावा जमविल्या. त्यात एका शतकाचाही समावेश आहे. याशिवाय तिने 3 बळीही मिळविले. लिझेली ली हिने विंडीज दौऱयात 4 सामन्यात तब्बल 124 च्या सरासरीने 248 धावा फटकावल्या. त्यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे.









