ऑनलाईन टीम / मुंबई :
परिवहन मंत्री अनिल परब यांनी मुरुड येथे अवैधरित्या रिसॉर्ट बांधले आहे. अशाप्रकारे अवैध काम करणाऱ्या व्यक्तीचे मंत्रीपद आणि आमदारकी काढून घेतली पाहिजे, यासाठी मी राज्यपाल आणि निवडणूक आयोगाकडे धाव घेणार असल्याचे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.
परब यांचे रिसॉर्ट अवैध असल्याचा निर्वाळा राज्याच्या पर्यावरण खात्याने दिला असून, रिसॉर्ट तोडण्यासाठी 17 डिसेंबरला नोटीस पाठवली होती. येत्या 3 जानेवारीपर्यंत या नोटीसवर उत्तर द्यायचे आहे. त्यामुळे येत्या 5 ते 7 जानेवारीपर्यंत राज्य सरकार मुरुड येथील अवैध रिसॉर्ट तोडण्याचा आदेश जारी करेल. हा आदेश आल्यानंतर मी तात्काळ राज्यपाल आणि निवडणूक आयोगाकडे धाव घेऊन परब यांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहे.
अवैध काम करणाऱ्या परब यांच्यासारख्या अनेक नेत्यांना मुख्यमंत्री ठाकरे यांनी पाठीशी घातले आहे. मात्र, परब यांचे रिसॉर्ट पर्यावरण खात्याने अवैध ठरवल्याने त्यावर कारवाई अटळ आहे, असेही सोमय्या म्हणाले.








