एक्सयुव्ही 300, 400, 700 चा समावेश ः वार्षिक उत्पादन 6 लाखावर नेणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा आगामी काळामध्ये आपल्या काही मॉडेल्सच्या उत्पादनामध्ये वाढ करणार असल्याची माहिती आहे. यामध्ये एक्सयुव्ही 300, एक्सयुव्ही 400, एक्सयुव्ही 700 व स्कॉर्पियो एन या गाडय़ांचा समावेश असणार आहे.
स्पोर्ट्स युटीलिटी व्हेईकल (सुव)गटातील वरील वाहनांची उत्पादन क्षमता पुढील 12 ते 15 महिन्यांमध्ये वाढवली जाणार आहे. त्यामुळे नव्या वाहन खरेदीदारांना यापुढे कमीत कमी वेळ थांबावे लागण्याची शक्यता सांगितली जात आहे. वर सुचविण्यात आलेल्या चारही मॉडेल्स कार्सचे उत्पादन वार्षिक तत्त्वावर 6 लाख इतके वाढवण्यात येणार आहे. आर्थिक वर्ष 2024 च्या चौथ्या तिमाहीपासून उत्पादन क्षमतेत वाढ दिसणार आहे. सुव गटातील कार्सनी सध्या ग्राहकांची मोठी पसंती प्राप्त केली आहे, असे असले तरी गाडय़ांची संख्या कमी असल्याने अनेक ग्राहकांना बुकींग करून कितीतरी दिवस थांबावे लागते आहे. हीच बाब हेरून कंपनीने आगामी काळामध्ये आपल्या लोकप्रिय सुव गटातील कार्सचे उत्पादन वाढविण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. याचा नव्या कार खरेदी करू इच्छिणाऱया ग्राहकांना नक्कीच फायदा होणार आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार एक्सयुव्ही 300 आणि एक्सयुव्ही 400 यांचे उत्पादन 9500 ने वाढविण्यात येणार आहे. ‘थार’ या गाडीचे उत्पादनही 6000 ने वाढविले जाणार आहे. तसेच स्कॉर्पियो एन चे उत्पादन महिन्याला 10,000 पर्यंत वाढविले जाणार आहे.









