नवी दिल्ली
वाहन क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी महिंद्रा ऍण्ड महिंद्रा यांनी माल वाहतूक करणारी पिकअप वाहने परत मागवण्याचा निर्णय घेतला आहे. फ्युल पाईपमध्ये बिघाड असल्याच्या कारणास्तव जवळपास 29,878 वाहनांना परत मागवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. जानेवारी 2020 ते फेब्रुवारी 2021 या दरम्यानच्या कालावधीत निर्मिती करण्यात आलेल्या सदरच्या मॉडेल्सना परत मागवून खराब फ्यूल पाईपची दुरुस्ती व अन्य निरीक्षणासह तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
दुरुस्ती विनाशुल्क
कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार सदरच्या वाहनांचे निरीक्षण आणि दुरुस्ती मोफत करण्यात येणार असून अशा प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी कंपनी आगामी काळात प्रयत्नशील राहणार असून योग्य सेवा देण्यावर लक्ष्य केंद्रीत करणार असल्याचेही महिंद्रा ऍण्ड महिंद्राने स्पष्ट केले आहे.









