शिवमंदिरात नियमावलीत धार्मिक विधी होणार, भाविकांना दर्शनासाठी काही मंदिरे बंद राहणार
प्रतिनिधी / कोल्हापूर
शहर आणि परिसरात गुरूवारी, 11 रोजी महाशिवरात्री साजरी होत आहे. शिवमंदिरांवर विद्युत रोषणाई केली आहे. पण कोरोना प्रतिबंधक नियमावलीत गुरूवारी शिवमंदिरांत धार्मिक विधी होणार आहेत. अधिकतर मंदिरे भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार आहेत. शहरातील काही शिवमंदिरांनी महाशिवरात्रीचा पालखी प्रदक्षिणा सोहळा रद्द केला आहे. त्यामुळे भाविकांना महाशिवरात्री घरीच साजरी करावी लागणार आहे.
शहर परिसरासह जिल्ह्यातील अनेक गावात शिवमंदिरे आहेत. काही गावात ती कुलदैवत, ग्रामदैवत म्हणून परिचित आहेत. महाशिवरात्रीला तेथे भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होते. वडणगे, कणेरीमठ, पनोरी येथील महाशिवरात्रीची यात्रा कोरोनाच्या पार्श्वभुमीवर रद्द झाली आहे. गुरूवारी सर्वत्र महाशिवरात्री साजरी होत आहे. त्यासाठी शिवमंदिरांवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दरम्यान, शहरात महाशिवरात्रीच्या पार्श्वभुमीवर मोठ्या प्रमाणात बेल विक्रीसाठी आला आहे.
जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा वडणगे येथील महादेव मंदिर, कसबा बीड येथील सातेरी महादेव, पाचवडे येथील त्रिपुरेश्वर, भेडसगाव निळकंठेश्वर, नंदवाळ येथील भीमाशंकर, सादळे मादळे येथील महादेव मंदिर, नंदवाळ येथील भीमाशंकर मंदिरात होणारी महाशिवरात्री यात्रा रद्द केली आहे. पण मानकऱयांच्या उपस्थितीत तेथे गुरूवारी धार्मिक विधी होणार आहेत.
शहरातील गंगावेश येथील ऋणमुक्तेश्वर, मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील वटेश्वर, उत्तरेश्वर पेठेतील उत्तरेश्वर, मंगळवार पेठेतील रावणेश्वर, अंबाबाई मंदिरातील अतिबलेश्वर, जोतिबा रोडवरील काशी विश्वेश्वर, कपीलतीर्थ येथील कपिलेश्वर यासह अन्य मंदिरांवर महाशिवरात्रीच्या पार्श्वभुमीवर विद्युत रोषणाई केली आहे. ऋणमुक्तेश्वर मंदिरात गुरूवारी धार्मिक विधी होणार आहेत. पण सांस्कृतिक स्पर्धा, कार्यक्रम रद्द केले आहेत. मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे.
कपिलतीर्थ येथील करवीरचे ग्रामदैवत कपिलेश्वर मंदिरात धार्मिक विधी साधेपणाने होणार आहेत. त्यानंतर गुरूवारी दिवसभर मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे. कपीलतीर्थ व्यापारी असोशिएशनच्यावतीने होणारा महाप्रसादही रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती मंदिराचे विश्वस्त नचिकेत धर्माधिकारी यांनी दिली.









