सांगली / प्रतिनिधी
महाशिवरात्रीनिमित्त मंगळवारी हरिपूर येथील प्रसिद्ध संगमेश्वर मंदिरासह सांगलीतील केशवनाथ मंदिर, श्रीक्षेत्र सागरेश्वर, तसेच जुना पन्हाळा म्हणून ओळख असलेल्या कवठेमहांकाळ तालुक्यातील कुकटोळी येथील गिरलिंग देवस्थान येथे दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. या निमित्ताने हरिपूर येथे संगमेश्वराला ऊस आणि द्राक्ष रसाचा अभिषेक करण्यात आला. कडेगाव तालुक्यातील सागरेश्वर येथे ताकारी, तुपारी, दह्यारी घोगाव, देवराष्ट्रे, कुंडल, पलूस, बोरगाव, अंबक चिंचणी आदी गावातील लोकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. दरम्यान महाशिवरात्रि दिवशी मौजे डिग्रज ता. मिरज येथे बसवेश्वर देवाची यात्रा भरवण्यात आली आहे.