जगात गणल्या जाणाऱया कॅपिटॉल हिल या इमारत प्रकल्पात अमेरिकन संसद आहे. डिसेंबरमध्ये जे निवडणूक निकाल जाहीर करण्यात आले, त्यावर या संसदेत चर्चा होऊन मतदान केले जाणार होते. या विषयावर एकूण 15 तास चर्चा झाली आणि त्यात झालेल्या मतदानात जो बायडन यांच्या राष्ट्राध्यक्षपदावर अमेरिकन संसदेने शिक्कामोर्तब केले. मात्र अमेरिकन संसद आपल्या विरोधात जात असल्याचे लक्षात येताच ट्रम्प समर्थकांनी संसदेत घुसून जो हिंसाचार माजविला त्यातून पोलिसी गोळीबारात एका महिलेसह 5 जणांचा बळी गेला. जगातील महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱया अमेरिकेमध्ये सत्तेसाठी जो काही प्रकार झाला तो निश्चितच अशोभनीय आहे, शिवाय गेल्या दोन शतकांची असलेली प्रतिष्ठाही त्यामुळे धुळीस मिळाली. अमेरिका ही जगातील सर्वात मोठी शक्ती आहे. जगात कोणत्याही देशात लष्करी राजवट आली आणि जगातली सर्वात मोठी आणि आदर्श लोकशाही म्हणून गौरविल्या जाणाऱया अमेरिकेमध्ये बुधवारी जो काही प्रकार घडला तो जेवढा धक्कादायक तेवढाच लांच्छनास्पदही आहे. गेल्या 206 वर्षांमध्ये जे घडले नाही व जे घडू नये असे अमेरिकेच्या संसदेत घडले. अमेरिकेच्या इतिहासातील हा एक अत्यंत काळाकुट्ट आणि रक्तरंजीत असा दिवस गणला जाईल. संपूर्ण जग या प्रकाराने हादरले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे संसदीय निवडणुकीत हरले आणि त्यांच्या विरोधात डेमोक्रेटिक पक्षाचे जो बायडन हे विजयी झाले. मात्र त्यांना राष्ट्राध्यक्ष होण्यापासून अटकाव करण्याकरिता ट्रम्प समर्थकानी व स्वतः ट्रम्प यांनी आतापर्यंत अनेक कारस्थाने केली परंतु त्यांचा कोणताही परिणाम झाला नाही. गेल्याच महिन्यात अमेरिकेच्या संसदीय पद्धतीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला व त्यात ट्रम्प यांना 232 तर ज्यो बायडन यांना 306 मते मिळाली. अमेरिकेमध्ये संसदीय कार्यात जेव्हा गृहयुद्ध होते त्यावेळी लोकशाही खऱया अर्थाने धोक्यात आली, असे म्हणावे लागेल. संसदीय निवडणूक निकालावर असमाधानी असलेल्या ट्रम्प यांना लोकशाहीची तत्त्वे मानावीच लागली, त्यामुळेच त्यांनी 20 जानेवारी रोजी सत्तेचे हस्तांतर जो बायडन यांच्याकडे करणार अशी घोषणा करणे त्यांना क्रमप्राप्त ठरले. मात्र अमेरिकेच्या इतिहासात जवळपास प्रथमच असा हा प्रकार घडलेला आहे. अमेरिकन लोकशाहीच्या परंपरेला काळिमा फासणाराच हा प्रकार आहे. जगाला दिशा दाखविणाऱया राष्ट्रातदेखील हा प्रकार होतो याचा अर्थ अमेरिकेतील जनतेच्या मानसिकतेमध्ये देखील आता बदल होतो आहे हे यावरुन स्पष्ट होते. या महान शक्तीशाली राष्ट्रामध्ये सत्तेवरुन संघर्ष एवढय़ा पदावर जाणे हे निश्चितच आश्चर्यकारक आहे. अमेरिकन संसदेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी जो काही हिंसाचार घडविला त्यातून खरे तर अमेरिकेच्या लोकशाहीलाच धक्का बसलेला आहे. अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष असलेल्या जो बायडन यांच्या विजयावर अमेरिकन संसदेचे शिक्कामोर्तब होऊ नये याच हेतूने वॉशिंग्टनमधील कॅपिटॉल इमारतीवर ट्रंपच्या शेकडो समर्थकांनी धडक दिली. राष्ट्राध्यक्ष निवडणुकीतील इलेक्ट्रोल मतांची मोजणी इथे झाली, त्यात जोसेफ बायडन विजयी झाल्याची घोषणा ट्रंप समर्थकांच्या पचनी पडलेली नाही. हातची सत्ता गेल्याने ट्रम्प सैरभैर झालेले आहेत. त्यांनी आपल्या समर्थकांना व्ट्टिद्वारे एक संदेश पाठविल्यानंतर भडका उडाल्याचे ऐकिवात आहे. त्यानंतर व्ट्टिर व अन्य काही सोशल मीडियाच्या कंपन्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे सोशल मीडियावरील अकाउंट ब्लॉक केले. अमेरिकेच्या संसदीय परंपरेत खेळखंडोबा करणाऱया ट्रम्प यांना सोशल मीडियातील कंपन्यांकडूनदेखील दणका मिळणे हे वास्तविक शोभत नाही. परंतु ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांकरवी जो काही गोंधळ घातलेला आहे त्याने ना केवळ अमेरिकेला, तर जगालाच हादरवून सोडलेले आहे. अमेरिकेमध्ये जो काही प्रकार घडला ती वस्तूतः अशक्यप्राय अशीच घटना होती. न जाणो असे प्रकार जगातील इतर राष्ट्रांच्या संसदेमध्येदेखील घडू शकतात. सध्या भारतात विशेषतः नवी दिल्लीत शेतकऱयांचे भले मोठे आंदोलन सुरू आहे संसदेचे अर्थसंकल्पीय हिवाळी अधिवेशन सुरु होईल तोपर्यंत शेतकऱयांचे आंदोलन संपुष्टात आले नाही व लाखो शेतकरी संसदेच्या दिशेने चाल करून आल्यास काय करणार? अमेरिकेमध्ये जर असा प्रकार घडू शकतो तर मग भारतात का नाही होऊ शकत अशी चर्चाही सुरू झालेली आहे. जो काही धुमाकुळ झालेला आहे तो पाहता तेथील काही शक्तींचा लोकशाही प्रणालीवर विश्वास नाही. जनतेने झिडकारल्यानंतर ट्रम्प यांनी स्वतःहून माघार घेणे आवश्यक होते. मात्र ‘गिरे तो भी टांग उपर’ या प्रमाणे ट्रम्प समर्थकांनी हैदोस माजवून अमेरिकेच्या संसदीय परंपरेला काळिमा फासला आहे. अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी आतापर्यंत संयम पाळलेला होता मात्र आता त्यांनीही झाल्या प्रकाराबाबत क्रोध व्यक्त केला. अमेरिकन लोकशाही धोक्यात आल्याची संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केलेली आहे. अमेरिकेच्या इतिहासात असा प्रकार प्रथमच घडलेला आहे. 206 वर्षांपूर्वी एका युद्धात अमेरिकेचा पराभव झाल्यानंतर याच अमेरिकन संसदेत ब्रिटीश घुसले होते त्यानंतर हा प्रकार प्रथमच झाला. तथापि, यावेळी संसदेत घुसलेली माणसे परकी नव्हती तर अमेरिकेचेच नागरिक होते. त्यामुळे अशा प्रकाराने संसदीय कामकाज पद्धतीवर घाला घालण्याचा प्रकार निश्चितच निंदयनीय आहे. या प्रकाराने मात्र ‘मोठय़ा घराचे पोकळ वासे’ यावर शिक्का बसतो. अमेरिकेतील या प्रकराने जो बायडन यांच्या बाजूला जरी बहुमत आलेले असले तरी देखील अमेरिकेमध्ये असे प्रकार यानंतर पुढे होऊ शकतात हे गृहीत धरुन त्यानुसार पावले उचलावी लागतील. शिवाय सत्ता चालविणे हे एक फार मोठे आव्हान राहील, असा इशाराच ट्रम्प यांनी या माध्यमातून दिला असावा.
Trending
- schedule
- इंग्लंड महिलांचा दुसरा विजय
- दीपक, कमलजीत, राज चंद्रा यांना सांघिक सुवर्ण,
- सावंतवाडी शहरातील रस्ते आणि स्वच्छता व्यवस्थेची दूरवस्था
- न्हावेली शाळेच्या छप्पर दुरुस्तीसाठी ग्रामस्थांकडून शिक्षणमंत्र्यांना निवेदन
- शिवसंस्कारच्या माध्यमातून सावंतवाडीत इतिहास अभ्यासकांचा होणार सन्मान
- भाजप प्रवेश नाकारल्यामुळेच मंत्री केसरकर धनुष्यबाणावर लढतायत
- रत्नागिरी रेल्वे स्थानकाबाहेर कामगार सेनेचे जोरदार आंदोलन