ऑनलाईन टीम / मुंबई
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनास्थिती काहीशी दिलासा देणारी असुन यामुळे राज्यशासनाने राज्यातील शाळा, मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच उद्योग धंदे ही मंदगतीने पुर्वस्थितीत येत आहेत. मात्र अद्याप महाविद्यालयांबद्दल अद्याप कोणता ही निर्णय झालेला नाही. याबाबत राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी वक्तव्य केले आहे.
येत्या ४ ऑक्टोबरपासून राज्यात शाळा सुरू होणार आहेत. मात्र महाविद्यालये कधी सुरू होणार याबद्दल माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, यावर राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महाविद्यालये सुरू करण्यासंबंधी महत्त्वाची माहिती दिली मुंबई येथे माध्यमांशी बोलताना सामंत म्हणाले, करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी योग्य ती काळजी घेऊनच महाविद्यालये सुरु केली जाणार आहेत.
तसेच १ नोव्हेंबरपासून महाविद्यालयं सुरू करावीत असं यूजीसी आणि एआयसीटीईचं म्हणणं आहे. मात्र आपल्याकडे दिवाळीचा सण असल्याने त्या काळात महाविद्यालये सुरू करता येणार नाहीत. त्यानंतरच कदाचित कॉलेज सुरू करण्याच्या विचारात राज्यसरकार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. तसेच याविषयी राज्य कृती दल आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल. असे ही त्यांनी सांगितले.