प्रतिनिधी / वाकरे
महाविद्यालयीन जीवनात अभ्यासाबरोबरच कला आणि क्रीडाक्षेत्राला महत्वाचे स्थान असून विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतःला विकसित करावे आणि ध्येय निश्चित करून वाटचाल करावी, असे आवाहन मिस्टर युनिव्हर्स आणि मिस्टर आशिया शरीरसौष्ठवपटू संग्राम चौगुले यांनी केले.
कोपार्डे( ता. करवीर) येथील स.ब.खाडे महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्यावतीने आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी श्री. चौगुले बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.डी.कुरळपकर होते.
चौगुले यांनी आपण गेल्या बारा वर्षात देश विदेशातील ४०० शरीरसौष्ठव स्पर्धेत भाग घेतल्याचे सांगून आपल्या आयुष्यातील उच्च ध्येय गाठल्याचे सांगितले. सध्याच्या धावपळीच्या युगात विद्यार्थ्यांनी आपला फिटनेस सांभाळावा असे आवाहन त्यांनी केले.
प्राचार्य डॉ. डी.डी. कुरळपकर यांनी महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते असे सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.एस.पी.चौगले यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर श्री. चौगुले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचे उदघाटन आणि विद्यार्थ्यांना तिळगुळ वाटप करण्यात आले. नॉर्थ ओरिसा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयास भेट देऊन सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. तसेच महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन,पोवाडा असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. आभार जिमखाना प्रमुख प्रा.डॉ.अभिजित वणीरे यांनी मानले.कार्यक्रमाला उपप्राचार्य बी.एम.कुंभार, प्रा.डॉ. बी.एस. शिंदे, नेमबाजी प्रशिक्षक युवराज चौगले, शिवगर्जना फौंडेशनचे अध्यक्ष दिगंबर चव्हाण,महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
ओरिसाच्या विद्यार्थ्यांनी रंगत वाढवली
नॉर्थ ओरिसा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी ओरिसाच्या सांस्कृतिक परंपरेवर आधारित कार्यक्रम सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.









