प्रतिनिधी / सातारा :
महावितरण कंपनीचे कर्मचारी, अधिकारी हे लॉकडाऊन काळात चांगले काम करत आहेत. त्यांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देण्यात यावा, कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात यावे, आदी मागण्यांसाठी सोमवारपासून महावितरणचे कर्मचारी काम बंद आंदोलन करणार आहेत, अशी माहिती एम.एस.ई वर्कर्स फेडरेशन महाराष्ट्र राज्यचे संयुक्त सचिव नानासाहेब सोनवलकर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
सोनवलकर यांनी पत्रकात म्हटले आहे, महानिर्मिती, महापारेषण, महावितरण या कंपनीतील वीज कामगार, अधिकारी, अभियंता आणि आऊट सोर्सिंग कामगार हे सर्व फ्रंट वर्कर काम करतात. म्हणून महाराष्ट्र सरकारने या सर्वांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा द्यावा. त्यांना प्राधान्याने लस देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र शासनाकडे केली होती. त्याबाबत उर्जा विभाग व महाराष्ट्र शासनाचे नकारात्मक धोरण असताना सुद्धा गेली दीड वर्ष कोरोना महामारीच्या काळात वीज कामगार, अधिकारी, अभियंता व कंत्राटी कामगारांनी राज्यातील जनतेला अखंडीत वीज पुरवठा सुरु ठेवण्यात यशस्वी झाले. पाणी पुरवठा, दिवा बत्ती, लॅपटॉप, मोबाईल चॅर्जिंग, टी.व्ही. रेडिओ, इमारतीमधील लिफ्ट इ. सेवा सुरळीत राहिल्या म्हणून राज्यातील जनता व वीज ग्राहक लॉकडाऊन काळात घरात राहू शकले, अशी सेवा देत असताना तिन्ही कंपन्यांतील 400 च्या वर वीज कामगार, अधिकारी, अभियंता व आऊट सोर्सिंग कंत्राटी कामगार मृत्यू पावलेले असून त्यांचे कुटुंबिय कोरोनाने आजारी आहेत. म्हणून संयुक्त कृती समिती संघटनांची मागणी केली आहे की, त्यांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देवून कोरोना प्रतिबंधक लसीकरण प्रथम करावे या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे.
सोमवारपासून (दि.24) सर्व वीजकामगार, अधिकारी, अभियंता व कंत्राटी कामगार कामावर हजर राहतील.परंतु काम करणार नाहीत. फक्त आंदोलन काळात हॉस्पिटल व अत्यावश्यक सेवा यांनाच वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याचे काम करण्यात येईल, इतर कोणतेही काम केले जाणार नाही, असा निर्णय सहा संघटनांच्या संयुक्त कृती समितीने घेतला आहे. काम बंद काळात औद्योगिक शांततेचा भंग झाल्यास त्यास महाराष्ट्र शासन व प्रशासन जबाबदार राहिल, असे नानासाहेब सोनवलकर यांनी सांगितले.









