ऑनलाईन टीम / पुणे :
आर्थिक संकटात असलेल्या महावितरणला कठीण समयी साथ देत पश्चिम महाराष्ट्रातील 4 लाख घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांनी गेल्या महिन्याभरात 479 कोटी 64 लाख रुपयांच्या थकीत वीजबिलांचा भरणा केला आहे. मात्र अद्यापही याच वर्गवारीतील तब्बल 23 लाख 70 हजार 700 ग्राहकांकडे 1384 कोटी 57 लाख रुपयांची थकबाकी असल्याने नाईलाजाने वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु राहणार आहे.
गेल्या 15 फेब्रुवारीपर्यंत पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात 27 लाख 72 हजार 360 घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांकडे 1864 कोटी 20 लाख रुपयांची थकबाकी होती. ही थकबाकी भरण्याचे आवाहन करण्यासाठी महावितरणचे वरिष्ठांसह सर्व अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष वीजग्राहकांशी संवाद साधत आहे. त्यास प्रतिसाद देत गेल्या महिन्याभरात, 15 मार्चपर्यंत 4 लाख 1 हजार 700 थकबाकीदारांनी 479 कोटी 64 लाख रुपयांच्या थकीत वीजबिलांचा भरणा केला आहे. यामध्ये सर्वाधिक 3 लाख 52 हजार 380 घरगुती ग्राहकांनी 303 कोटी 37 लाख, 41 हजार 620 वाणिज्यिक ग्राहकांनी 120 कोटी 40 लाख तर 7660 औद्योगिक ग्राहकांनी 55 कोटी 56 लाखांच्या थकबाकीचा भरणा केला आहे.
थकबाकीचा भरणा होत असला तरी अद्यापही घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील तब्बल 23 लाख 70 हजार 700 ग्राहकांकडे 1384 कोटी 57 लाख रुपयांची थकबाकी आहे. यात (कंसात ग्राहक) पुणे जिल्हा (10,75,626) – 738 कोटी 13 लाख, सातारा (2,13,285)– 75 कोटी 33 लाख, सोलापूर (3,40,218)– 178 कोटी 65, सांगली (2,79,340)– 136 कोटी 47 लाख आणि कोल्हापूर जिल्ह्यात (4,62,225) – 255 कोटी 96 लाख रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी भरून सहकार्य करावे असे आवाहन प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे यांनी केले आहे.








