लांजा तालुक्यातील कुर्णे येथील घटना : सुका चारा जळून खाक : स्थानिकांनी आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला
प्रतिनिधी / लांजा
गवत वाहून नेणाऱया आयशर टेंपोला मार्गावरील महावितरणच्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने टेंपोने पेट घेऊन चारा खाक होण्याची घटना बुधवारी सकाळी 10.30 च्या दरम्यान तालुक्यातील कुर्णे घडशीवाडी स्टॉपनजीक घडली. पुनस येथील तरुणांच्या मदतीने आग आटोक्यात आल्याने पुढील अनर्थ टळला.
सापुचेतळे येथील शंकर गोरे हा आयशर टेंपोतून (एमएच 08, एच 0958) गवताच्या गंजी घेऊन तालुक्यातील आसगे येथून सापुचेतळेच्या दिशेने निघाला होते. यावेळी देवधे-पुनस-सापुचेतळे मार्गावर कुर्णे घडशीवाडी स्टॉपजवळ मार्गावरून गेलेल्या महावितरणच्या विद्युत तारेला टेंपोतील गवताच्या गंजीचा स्पर्श झाल्याने गवताने पेट घेतला. या आगीने अल्पावधीत मोठे स्वरुप धारण केले. अन्य वाहनचालकांनी आरडाओरड केल्याने शंकर गोरे यांनी टेंपो थांबवून टेंपोबाहेर उडी मारली. उपस्थितांनी मोबाईलद्वारे संपर्क साधून कुर्णे व पुनस येथील नागरिकांकडे मदत मागितली. पुनस येथील इम्तियाज बंदरी यांनी पाण्याचा टॅंकर आणून कुर्णे व पुनस येथील तरुणांच्या मदतीने आग आटोक्यात आणली. लांजा नगर पंचायतीचा टॅंकरही घटनास्थळी दाखल झाला होता. आग वेळीच आटोक्यात आणण्यात यश आल्याने मोठी हानी टळल्याचे सांगण्यात आले.
लांजा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक अनिल गंभीर, दिनेश आखाडे, चालक राजेंद्र देसाई, नितीन पवार यांनी घटनास्थळाला भेट दिली. मात्र संबंधित मालकाने तक्रार न दिल्याने घटनेची नोंद पोलिसात करण्यात आलेली नाही, असे समजते.









