ऑनलाईन टीम / पुणे :
वीजबिलांचा भरणा होत नसल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणकडून पुणे परिमंडलातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांशी मोबाईलद्वारे थेट प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांना चालू व थकीत देयके भरण्याची विनंती करण्यात येत आहे. त्यास प्रतिसाद देत पुणे परिमंडलातील 68 हजार वीजग्राहकांनी आतापर्यंत 99 कोटी 61 लाख रुपयांच्या थकबाकीचा भरणा केला आहे.
पुणे परिमंडलात लॉकडाऊनच्या मार्च, एप्रिल व मे तसेच जून महिन्यामध्ये वीजबिलांचा भरणा 50 टक्क्यांपर्यंत खालावला होता. त्यानंतर जुलैपासून वीजबिलांचा भरणा वाढला असला तरी सद्यस्थितीत पुणे परिमंडलामधील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक 11 लाख 65 हजार ग्राहकांकडे 794 कोटी रुपयांची थकबाकी झाली आहे. थकबाकीच्या अशा बिकट स्थितीत ज्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे पाच हजार रुपयांपेक्षा अधिक थकबाकी आहे त्यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधून वीजबिलांच्या थकीत रकमेचा भरणा करण्याची विनंती महावितरणकडून करण्यात येत आहे. यासोबतच वीजबिलांबाबत काही तक्रारी किंवा शंका असल्यास त्याचेही निवारण करण्यात येत आहे.
थेट संपर्क साधून वीजबिलांचा भरणा करणाच्या आवाहनाला प्रतिसाद देत आतापर्यंत पुणे परिमंडलातील 68 हजार 300 थकबाकीदारांनी 99 कोटी 61 लाख रुपयांचा भरणा केला आहे. यामध्ये पुणे शहरातील 26 हजार 725 ग्राहकांनी 43 कोटी 60 लाख, पिंपरी व चिंचवड शहरातील 16 हजार 900 ग्राहकांनी 23 कोटी 90 लाख आणि आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी व वेल्हे तालुक्यातील 24 हजार 700 ग्राहकांनी 32 कोटी 10 लाख रुपयांचा भरणा केला आहे.
दरम्यान, पुणे परिमंडलातील सर्व वीजबिल भरणा केंद्र सुरु आहेत. यासोबतच लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांना महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाईट किंवा मोबाईल ॲपद्वारे तसेच इतर ‘ऑनलाईन’ पर्यांयाद्वारे वीजबिलांचा भरणा घरबसल्या करण्याची सोय उपलब्ध आहे.