ऑनलाईन टीम / बारामती :
राज्याच्या सर्वांगीन विकासासाठी महाविकास आघाडी एकत्र आली आहे. वेगगेगळ्या विषयांवर वेगवेगळी मतं असू शकतात. मात्र, आघाडीत फूट पडणार नाही. ती अभेद्य आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे मतदान केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीविरोधात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वेगवेगळी मतं असल्याचे समोर आले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात सरकारमध्ये फूट पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.
याविषयी पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, महाविकास आघाडी ही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या विचाराने तयार झाली आहे. आमच्यात मतभेद असू शकतील. पण मनभेद नाहीत. राज्याचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास आहे. त्यासाठी आम्ही सर्वजण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत. महाविकास आघाडी अभेद्य आहे.








