26 फेब्रुवारीला शिर्डीतून आंदोलन सुरु होणार
सांगली / प्रतिनिधी
महाविकास आघाडी सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलेला आहे. दोन टप्प्यात एफआरपी ला विरोध करण्यासाठी 26 फेब्रुवारी पासून शिर्डीतून रयत क्रांती आणि भाजप किसान मोर्चा आंदोलन छेडेल अशी घोषणा रयत क्रांती संघटनेचे संस्थापक, माजी कृषी राज्यमंत्री आ. सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
खोत म्हणाले, शुगर केन कंट्रोल अॅक्ट 1966 नुसार शेतकऱ्यांना केंद्र सरकारने जाहीर केलेली एफआरपी ऊस तुटल्यानंतर 14 दिवसाच्या आत एकरकमी मिळाली पाहिजे हा कायदा होता, पण या कायद्याची पायमल्ली करण्याचं काम राज्य सरकार करत आहे. ही एफआरपी आता दोन टप्यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे. पहिला टप्पा हा पश्चिम महाराष्ट्र, खानदेशासाठी 10 टक्के रिकवरीचा आहे.
दुसरा टप्पा मराठवाडा विदर्भसाठी 9.5 टक्के रिकव्हरी चा आहे. यातून तोडणी, वाहतूक वजा करायची आहे. दुसरा हप्ता साखर कारखान्याचा गाळप हंगाम संपल्यानंतर १५ दिवसांनी द्यायचा आहे. कारखान्याने केलेले जे खर्च आहेत, ते सर्व खर्च वजा करून राहिलेले पैसे शेतकऱ्याला द्यायचे आहेत. याचा अर्थ सरळ आहे की, “साखर कारखानदार तुपाशी अन् माझा शेतकरी उपाशी” अशा पद्धतीचा निर्णय या सरकारने घेतलेला आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे नाही तर शेतकऱ्यांना मातीत घालणारं सरकार आहे. शेतकरीद्रोही सरकार या राज्यांमध्ये काम करत आहे. त्याच्या विरोधात येत्या 26 फेब्रुवारीला शिर्डी (जि. अहमदनगर) येथून रयत क्रांती संघटना व भाजपा किसान मोर्चा अशी संयुक्तरित्या आंदोलनाची घोषणा करत आहे. या सरकारच्या विरोधामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन उभे केले जाईल, अशी प्रतिक्रिया रयत क्रांती संघटनेचे संस्थापक, माजी कृषी राज्यमंत्री आ. सदाभाऊ खोत यांनी दिली.