राज्यातील मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, औरंगाबाद आणि नागपूरसह प्रमुख महापालिकांच्या निवडणुका यावर्षी होत असल्याने या निवडणुकांपूर्वीच महाविकास आघाडी सरकारमधील मित्रपक्षांत मोठी धुसफुस सुरू झाली आहे. दुसरीकडे राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेत असलेल्या काँग्रेसने मात्र गोवा विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा प्रयोग गोव्यात करण्यास असमर्थता दर्शविल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेना एकटी पडली आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारला आता दोन वर्ष पूर्ण होऊन गेले, 2022 या वर्षी राज्यातील प्रमुख महापालिकांच्या निवडणुकांचे वारे वाहु लागल्यानंतर महाविकास आघाडीत मित्रपक्षांमध्ये जोरदार धुसफुस सुरू झाल्याचे बघायला मिळत आहे. ठाण्यात उड्डाणपुलाचे श्रेय कुणाचे यावरून ठाण्याचे पालकमंत्री तसेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि गफहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड शनिवारी आमने-सामने आले. दोन मंत्र्यांमध्येच कलगीतुरा झाल्याने मग राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि शिवसैनिकांमध्येही घोषणाबाजी झाली. महाविकास आघाडीतील कार्यकर्ते आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही अनेकदा कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे बघायला मिळालेत.मात्र या प्रकरणामुळे आता ठाण्यात संभाव्य शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीत बिघाडी निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण या सगळय़ा घडामोडीवरून ठाण्याचे महापौर नरेश मस्के यांनी राष्ट्रवादीला इशारा देताना स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. तर, आघाडी होणारच असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त
केला आहे.

राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री शिवसेनेचा असला तरी निधीवाटपात मात्र शिवसेना तिसऱया स्थानी आहे. काँग्रेसही शिवसेनेला मागे टाकत दुसऱया स्थानी आहे. तर अर्थ खाते असणारा राष्ट्रवादी काँगेस पक्ष हाच राज्यात निधीवाटपात अव्वलस्थानी आहे, त्यामुळे शिवसेना आमदार सरकारमध्ये असले तरी नाराज आहेत. सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांनी आपण भाजपमुळे निवडून आलो असून सरकारमध्ये जरी असलो तरी आम्हाला कोणीही विचारत नसल्याचे जाहिरपणे सांगितले. तर शिवसेनेचे कोरेगाव येथील आमदार महेश शिंदे यांनी तर थेट शरद पवार अध्यक्ष असलेल्या रयत शिक्षण संस्थेबाबत बोलताना रयत शिक्षण संस्थेचे खासगीकरण होता कामा नये, जनतेचा विचार करुन शरद पवार रयतचे अध्यक्षपद सोडतील अशी टिका केली. त्यानंतर राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे यांचा चांगलाच समाचार घेतला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत जे एकमेकांसमोर लढले त्यानंतर सत्तेसाठी एकत्र आले तेच आता पुन्हा एकमेकांसमोर लढण्याची भाषा करू लागलेत, त्यामुळे आता महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर महाविकास आघाडीत जोरदार धुसफुस सुरू झाली आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानं रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेवर पोटनिवडणूक
लागण्याचे संकेत आहेत. या पार्श्वभूमीवर तेथील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. चंद्रकांत जाधव यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत 2019
ला निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी
दोन टर्म आमदार राहिलेल्या शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांचा पराभव केला होता. आता राजेश क्षीरसागर यांनी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठं वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आदेश दिल्यास पोटनिवडणूक लढवण्याची तयारी असल्याचे क्षीरसागर म्हणाले आहेत. मी निवडणूक
लढवली तर 50 हजारच्या लीडनं विजयी होईन, दोन वर्षात मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीत मिठाचा खडा टाकला नाही. मग, जिल्हा बँकेत काँग्रेस, राष्ट्रवादीला भाजपला सोबत घ्यावंसं का वाटलं? असा सवाल विचारताना शिवसेनेवर अन्याय होत असून पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडून कोणताही निधी दिला जात नसल्याचे ते म्हणाले. तर दुसरीकडे जुन्नरमधील राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अतुल बेनके आणि त्यांच्या विरोधात निवडणूक लढविलेले शिवसेनेचे शरद सोनावणे यांच्यात तू तू मै मै झाल्याचे बघायला मिळाले. याच भागातील राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्यातील वाद हा सर्वश्रुत असून सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला परवानगी दिल्यानंतर आढळराव पाटील यांनी भरविलेली बैलगाडा शर्यत रद्द करण्याच्या निर्णयावरुन पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आगामी काळात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील दरी ही स्थानिक पातळीवर वाढतच असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा संघर्ष वाढणार यात शंका नाही.
गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीला सोबत घेण्यास काँग्रेसचा विरोध
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग केल्यानंतर गोव्यातही हा प्रयोग करणार असल्याचे सुतोवाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले होते. मात्र काँग्रेस गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी दोघांना सोबत न घेता स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी गोव्यात एकत्र लढणार असून येत्या दोन दिवसात या बाबतचा निर्णय होणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. काँग्रेसने महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत एकत्र येत भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. महाराष्ट्रात सरकार स्थापन करताना ज्येष्ठे नेते शरद पवार यांनी काँग्रेस नेत्यांना दिलेला विश्वास काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांनी घेतलेली भूमिका आणि मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे यांचे नाव पाहता महाविकास आघाडी सत्तेवर आली. मात्र गोव्यात काँग्रेसने याबाबत थोडीही अनुकुलता दाखविली नाही. जे शिवसेना नेते संजय राऊत नेहमी युपीएच्या अध्यक्षपदाबाबत आणि काँग्रेस नेतृत्वाबाबत सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते. एकीकडे राज्यात काँग्रेस आणि भाजपचा समन्वय पाहता विधानपरिषदेच्या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱया कोल्हापूर येथील बंटी पाटील आणि धुळे येथील अमरीश पटेल आणि मुंबई स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजहंस सिंग यांच्या बिनविरोध निवडीसाठी काँग्रेस आणि भाजपने जो समन्वय दाखवला, तसेच खासदार राजीव सातव आणि विधानपरिषद आमदार शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर भाजपने उमेदवार दिला नाही. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर सातत्याने शिवसेना आणि राष्ट्रवादीला किमान समान कार्यक्रमाची आठवण काँग्रेसला करून द्यावी लागत होती. त्याच काँग्रेसने गोव्यात स्वबळाचा नारा दिल्याने आता याचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणात उमटणार का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
प्रवीण काळे








