ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्यातील महाविकास आघाडीच्या एका वरिष्ठ मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने मागील काही दिवसांपासून ते स्वतः होम क्वारंटाईन झाले होते. रविवारी त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना नांदेडमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
कोरोनाची लागण झालेले मंत्री काँग्रेसचे असून, देशात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून ते नांदेडमध्येच तळ ठोकून होते. विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी ते दोन आठवडे मुंबई आले होते. पाच-सहा दिवसांपूर्वी मुंबईतून आल्यावर त्यांना कोरोनाची लक्षणे आढळू लागल्याने त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. काल त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांना नांदेडमधील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
यापूर्वी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांना करोनाची लागण झाली होती. ते या आजारातून पूर्ण बरे होऊन बाहेर आल्यानंतर आता काँग्रेसच्या मंत्र्याना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.









